अपघातात दोन्ही हात गमावल्यानंतर मी पूर्णत: निराश झाले होते. आता आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी परावलंबी रहावे लागणार, ही भावनाच मला नैराश्याच्या गर्तेत पुन:पुन्हा ढकलत होती. मात्र, अक्षरश: चमत्कार झाला. मला मेंदूमृत व्यक्तीचे दोन हात मिळाले. डॉक्टरांनी दोन्ही हातांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. आज मी पूर्णपणे स्वावलंबी जीवन जगत आहे. मोनिका मोरे भारावून सांगत होती...कॉलेजमधून घरी परतत असताना कुर्ला स्थानकावर २०१४ साली रेल्वे अपघातात मोनिकाने दोन्ही हात गमावले. त्यानंतर डॉक्टरांनी तिला नकली हात बसविले. २८ ऑगस्ट २०२० रोजी मोनिकावर हाताच्या प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी चेन्नईतील ३२ वर्षीय एका मेंदूमृत व्यक्तीकडून हे हात घेण्यात आले. चेन्नईहून ते मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात आणण्यात आले. १५ तास चाललेल्या शस्त्रक्रियेत ११ तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते.
माेनिका म्हणते...‘माझ्या आयुष्यातील हा बदल केवळ शब्दातीत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीला माझा सलाम आहे. अपघातात हात गमविल्यानंतर सर्वच गोष्टींसाठी आता दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागेल असे वाटत होते. त्यामुळे कमालीचे नैराश्य आले होते. मला हात मिळावेत म्हणून डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. शस्त्रक्रियेपूर्वी डॉक्टरांनी माझे व कुटुंबीयांचे समुपदेशन केले. हाताच्या प्रत्यारोपणानंतर काही महिन्यांतच हाताच्या बोटांची हालचाल सुरू झाली. शस्त्रक्रियेला आता दोन वर्ष होतील. आज मी काम करू शकते आहे. कुठेही एकटीने प्रवास करू शकते. आठ महिन्यांपूर्वी रुग्णालयाने माझ्यावर विश्वास ठेवून मला नोकरी दिली. फोन उचलणे, लॅपटॉपवर टायपिंग करणे, चमच्यांच्या साहाय्याने जेवणे इत्यादी गोष्टी मी सहजपणे करू शकते. आम्ही हाताच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करतो. मात्र, शस्त्रक्रिया यशस्वी होणे पूर्णत: रुग्णावर अवलंबून असते. त्यात रुग्ण किती मेहनतीने फिजिओथेरपी करतो यावर हातात बळकटी निर्माण होत असते. मोनिकाची जिद्द पाहता तिने या सर्व गोष्टी वेळेवर केल्या. विशेष म्हणजे तिच्या त्वचेचा रंग हातालाही प्राप्त झाला आहे. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचे आयुष्य पूर्ण बदलून जाते.- डॉ. नीलेश सातभाई, मोनिकावर शस्त्रक्रिया करणारे प्लास्टिक सर्जन