मुंबई : एसटीचे चालक-वाहक ही एसटी महामंडळाची दोन चाके आहेत. चालकांमुळे अपघात टाळणे शक्य होते. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एका वर्षात सलग २६० दिवस अपघातविरहित सेवा पुरविणाऱ्या चालकांचा बक्षीस देऊन सन्मान करण्यात येत होता. मात्र आता ही योजना एसटी महामंडळाने बंद केली.
कोरोना काळातील आर्थिक भार कमी करण्यासाठी ही योजना बंद करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे चालकांमध्ये नाराजी आहे. ‘सुरक्षित प्रवास, एसटीचा प्रवास’ या ब्रीद वाक्यानुसार, एसटीचे सर्व कर्मचारी विशेषत: चालक आपले कर्तव्य चोख पार पाडतात. चालकांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस म्हणून १ हजार रुपये दिले जात होते. मात्र आता योजना बंद करण्यासंदर्भातील परिपत्रक राज्यभरातील विभागीय कार्यालयांना एसटी महामंडळाने दिले.यावर नाराजी व्यक्त करीत हा निर्णय मागे घेऊन योजना पूर्ववत सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली. रक्कम किती होती यापेक्षा बक्षिसाच्या रूपात मिळणारे प्रोत्साहन प्रेरणादायी होते, असे ते म्हणाले.