मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल सेवा बंद होती. त्यामुळे बेस्टच्या मदतीला एसटी पाठविण्यात आल्या होत्या. त्याचे नियोजन बेस्ट प्रशासनाकडून केले जात होते, तर देणी मुंबई महापालिका देत होती. त्यानुसार महापालिकेने एसटीला ५० कोटींची देणी दिली असून ९० कोटींची देणी थकली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने मुंबईतील लोकलसह सर्व प्रकारची रेल्वे सेवा बंद ठेवली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सफाई कर्मचारी आदी लोकांची वाहतूक करण्याची जबाबदारी शासनाने एसटी महामंडळावर टाकली होती. त्यानुसार मुंबईकरांच्या वाहतुकीसाठी १००० एसटी बेस्ट मार्गावर धावत होत्या. लोकल सुरू झाल्यानंतर मात्र टप्प्याटप्प्याने ५०० गाड्या कमी करण्यात आल्या होत्या. बेस्ट सेवेत असलेल्या गाड्या आणि कर्मचारी यांचा खर्च पालिका करत आहे. पालिकेने ५० रुपये दिले असून ९० कोटी रुपये देणे बाकी आहे. असे असले तरी एसटीची बेस्ट वाहतूक थांबविण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
.........
राज्यभरात एस.टी.चे अंदाजे २१० कर्मचारी कोरोनामुळे मृत्यू पावले. तसेच ९००० कर्मचारी बाधित झाले आहेत. बेस्ट वाहतूक कामगिरी करून गेलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोना झाला असून ही वाहतूक करून गावी परतलेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाणसुद्धा मोठे आहे. मृत्यूचा सापळा ठरलेली जीवघेणी बेस्ट वाहतूक तत्काळ बंद झाली पाहिजे.
श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस.