मुंबई : महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणून ओळखली जाणारी एसटी बसची सेवा ग्रामीण भागातील प्रवाशांना सुरळीतपणे आणिसहज उपलब्ध असली पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सार्वजनिक वाहतूक क्षमता वाढवत ग्रामीण भागातील जनतेला चांगली वाहतूक सेवा देण्यावर सरकारचा भर असणार असल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी मंगळवारी स्पष्ट केले.परब यांनी आज मंत्रालयात परिवहन आणि संसदीय कार्य या विभागांचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर विभागाच्या आढावा बैठकीत परब म्हणाले, ग्रामीण भागातील प्रवासी मोठ्या प्रमाणात एसटी बसवर अवलंबून असतो. विशेषत: विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी शाळा, महाविद्यालयांच्या वेळेत एसटी बससेवा उपलब्ध केली पाहिजे. विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाणार नाही याचा विचार करून वेळेत बससेवा देण्याबाबत विभागाने नियोजन करावे. राज्य परिवहन महामंडळाने उपलब्ध संसाधनांच्या माध्यमातून, कमी खर्चात चांगल्या योजनांच्या माध्यमातून प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा पुरविण्याचा विचार करावा, असे आवाहन मंत्री परब यांनी केले.
एसटीची ग्रामीण भागातील सेवा वाढविण्यावर भर - परब
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 5:51 AM