एसटीच्या हिरकणी कक्ष योजनेचा बोजवारा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 05:12 AM2018-08-06T05:12:04+5:302018-08-06T05:12:18+5:30
एसटीने प्रवास करणाऱ्या मातांना बाळाला स्तनपान देण्यासाठी ‘हिरकणी कक्ष’ योजना राबवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता.
- महेश चेमटे
मुंबई : एसटीने प्रवास करणाऱ्या मातांना बाळाला स्तनपान देण्यासाठी ‘हिरकणी कक्ष’ योजना राबवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. मात्र, योग्य अंमलबजावणीच्या अभावामुळे या योजनेचा बोजवारा उडाल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीतून दिसून आले आहे.
कुर्ला नेहरू नगर, मुंबई सेंट्रल आणि परळ स्थानकातील हिरकणी कक्ष अनेक महिन्यापासून बंद आहेत. प्रवाशांनी विचारणा केल्यानंतर स्तनपान करणाºया महिला वर्गाची सोय करण्यात येते. सुरुवातीला या कक्षाला चांगला प्रतिसाद होता. मात्र, कक्षात स्तनपान करणाºया महिलांना फलाटावर लागलेल्या एसटीची माहिती मिळत नसल्याने या कक्षाचा वापर कमी झाला. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून कक्ष बंद असल्याचे कुर्ला आणि परळ येथील एसटी अधिकाºयांनी गोपनियतेच्या अटीवर सांगितले.
एसटी मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांशी या बाबत संवाद साधला असता, राज्यातील २५० एसटी स्थानकावर हिरकणी कक्ष उभारण्याचे आदेश मुख्यालयाने दिले होते. यापैकी मुंबई, पुणे, विदर्भ, मराठवाडा यांसारख्या एसटी स्थानकावर हिरकणी कक्ष उभारण्यात आले. मात्र, त्याबाबत जनजागृती न झाल्यामुळे या
योजनेचा बट्टयाबोळ झाला. दरम्यान काही स्थानकांवर पुरुषासाठी
असलेले विश्रांतीगृहाचे रूपांतर महिलांसाठी असलेल्या हिरकणी कक्षात करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव आहे, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.
हिरकणी कक्षाबाबत महामंडळाशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, महिला प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची असलेल्या हिरकणी योजने बाबत परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याशी संपर्क साधला असता, ‘सध्या या बाबत माहिती नसून, माहिती घेऊन बोलतो’ असे मंत्री रावते यांनी सांगितले.
राज्यातील शिवशाही ते परिवर्तन (साधी) अशा सुमारे १८ हजार एसटी बसमधून सुमारे ६५ लाख प्रवाशांच्या वाहतुकीतून एसटी महामंडळाला दररोज सुमारे १८ ते २० कोटींचे उत्पन्न मिळते.
>असे होते
‘हिरकणी कक्ष’
स्थानकांमध्ये कमीत कमी ‘८ बाय १०’ आकाराचा हा कक्ष असावा. यात हवा खेळती रहावी या पद्धतीने हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात यावी. कक्षात स्तनपान करणाºया महिलांच्या आरामासाठी विशेष सोय करण्यात यावी. स्थानकांमधील उपलब्ध जागेनुसार या कक्षांची रचना करण्यात यावी, अशा स्वरूपाचा हिरकणी कक्ष असावा असे आदेश महामंडळाने सर्व विभागाना दिले होते.
>अशी झाली होती सुरुवात
राज्यातील दुर्गम भागात देखील एसटी जाते. त्यामुळे प्रवास करताना स्तनपान करणाºया मातांची गरज ओळखून ‘ब्रेस्ट फिडींग प्रमोशनल नेटवर्क आॅफ इंडिया’ या संस्थेने हिरकणी कक्षाची स्थापना केली जावी, अशा सूचना केली होती. त्यानुसार एसटी महामंडळाच्यावतीने स्वतंत्र परिपत्रक काढून राज्यातील प्रत्येक आगार, स्थानकात स्वतंत्र हिरकणी कक्ष उभे करण्याचे आदेश दिले होते.
जागरूकता हवी : बसवर लक्ष ठेवण्यासाठी आणि गाडी चुकेल या भीतीने हिरकणी कक्षाचा वापर महिलांकडून केला जात नाही, असा आरोप चुकीचा आहे. मुळात एसटी स्थानकात हिरकणी कक्ष असल्यास त्याची माहिती स्थानकाच्या दर्शनी भागात लावण्यात यावी. त्याचबरोबर स्थानकाच्या चौकशी कक्षाजवळ ‘या स्थानकात हिरकणी कक्ष आहेत’, असे फलक लावण्यात यावे. त्याच बरोबर कक्षात उद्घोषणा यंत्रणा कार्यान्वित करावी. आणि स्थानकातील उद्घोषणा यंत्रणेतून हिरकणी कक्षा बाबत माहिती देण्यात यावी, अशी मागणी मुंबई सेंट्रल स्थानकातील महिला प्रवासी सविता देशमुख यांनी केली.
>जागतिक स्तनपान सप्ताह विशेष
जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हिरकणी कक्षाचा आढावा घेतला असता, अकार्यक्षम अधिकारी, समनव्याचा अभाव, मनमानी कारभार यामुळे हिरकणी कक्ष असुविधेच्या गर्तेत अडकल्याचे स्पष्ट होत आहे.