एसटीचे उत्पन्न कमी, खर्च जास्त; प्रवाशांनी फिरवली लालपरीकडे पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 02:36 PM2022-09-19T14:36:26+5:302022-09-19T14:36:51+5:30
खासगी वाहनांचा पर्याय मिळाल्याने प्रवाशांनी फिरवली लालपरीकडे पाठ
नितीन जगताप
मुंबई : राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यातील प्रवासीवर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. मात्र, कोरोना आणि एसटी संपामुळे प्रवाशांनी खासगी वाहनांचा पर्याय शोधला असून त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत घट झाली आहे, त्यामुळे एसटीचा गाडा रुळावर येणार कसा? असा सवाल उपस्थित होत आहे.
एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोनामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. महामंडळाचे आर्थिक चाक पूर्वपदावर येत असतानाच गेल्या वर्षी ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला. त्यामुळे महामंडळाला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला. कोरोनापूर्व काळात एसटीच्या १८ हजार गाड्या धावत होत्या. या गाड्यांतून ६५ लाख जण प्रवास करत होते. तर २२ कोटींचे उत्पन्न मिळत होते. संप मिटून साडेपाच महिने झाले तरीही सप्टेंबरमध्ये सरासरी दैनंदिन प्रवासी संख्या ३० लाखांपर्यंत असून उत्पन्न केवळ १३ कोटी मिळत आहे. दररोज १२ कोटींची तूट आहे.
पावसामुळे प्रवासी संख्येत घट
एसटीची प्रवासी संख्या सध्या ३० लाखांपर्यंत, तर उत्पन्न १३ कोटींवर आले आहे. राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस आहे, त्यामुळे अनेकजण प्रवास करणे टाळतात. येत्या काही दिवसांत प्रवासी संख्या नक्की वाढेल.
- शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ
रुळावर येणार कधी?
एसटीचे मासिक अपेक्षित उत्पन्न : ७५० कोटी रुपये
प्रत्यक्षात मिळणारे उत्पन्न :
३९० कोटी रुपये.
वेतनावरील खर्च : ३५० कोटी रुपये.
डिझेल खर्च : २०० कोटी रुपये
इतर खर्च : २०० कोटी रुपये
एकूण तूट : ३६० कोटी रुपये