एसटीची रातराणी रिकामी, ट्रॅव्हल्स फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:06 AM2021-07-15T04:06:18+5:302021-07-15T04:06:18+5:30
मुंबई : अनलॉकनंतर सुरू झालेली एसटीसेवा आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. लालपरीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे; मात्र एसटीच्या ...
मुंबई : अनलॉकनंतर सुरू झालेली एसटीसेवा आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. लालपरीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे; मात्र एसटीच्या रातराणीला अल्प प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे ट्रॅव्हल्स मात्र फुल्ल आहेत.
संध्याकाळी सात ते पहाटे पाच यादरम्यान रातराणी धावते. यांचे दर लालपरीच्या तुलनेत जास्त आहेत. तरीदेखील याला प्रवाशांचा प्रतिसाद पूर्वी चांगला मिळत होता. विशेषत: कोल्हापूर, नाशिक, पुणे मार्गावर मात्र आता रातराणीची अवस्था बिकट आहे. ज्या काही रातराणी धावत आहेत त्याला अल्प प्रतिसाद लाभत आहे.
एसटीच्या रातराणीमध्ये स्लीपरचे प्रमाण कमी आहे तसेच भाडे जास्त, गाड्यांची संख्या कमी आहे त्यातुलनेत खासगी बस जास्त आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी खासगी गाड्यांना प्राधान्य देतात, असे एसटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
एसटीकडे एकही एसी स्लीपर नाही
मुंबई विभागात स्लीपर आहेत; पण त्या नॉन एसी आहेत तर एकही एसी स्लीपर नाही, त्यामुळे प्रवासी रात्री प्रवास करताना ट्रॅव्हल्सला प्राधान्य देत आहेत.
एस.टी.च्या सुरू असलेल्या रातराणी
मुंबई सोलापूर
मुंबई चिपळूण
मुंबई दापोली
मुंबई सडे
मुंबई कोल्हापूर
एसटीपेक्षा तिकीट जास्त तरीही गर्दी
एस.टी.पेक्षा ट्रॅव्हल्सचे तिकीट जास्त असते ते वेळोवेळी कमी-जास्तदेखील होते. त्या तुलनेत एस.टी.चे तिकीट स्थिर असूनदेखील प्रवासी ट्रॅव्हल्सने प्रवास करण्यास प्राधान्य देताना दिसून येत आहेत. ट्रॅव्हल्स स्लीपर कोच असल्याने आरामदायी प्रवास होत असल्याने प्रवाशांचा कल ट्रॅव्हल्सकडे असतो.
सध्या एस.टी. आगारातून साध्या बस धावत आहेत. त्या तुलनेत स्लीपर कोच असलेल्या ट्रॅव्हल्सने आरामदायी प्रवास होतो व आता भाडे स्थिर असल्याने कोल्हापूरला जाण्यासाठी आम्ही ट्रॅव्हल्सला प्राधान्य देत आहोत.
अमित शिंदे, प्रवासी.
पुण्याला जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करत आहे. एसटीचे भाडे स्थिर असते म्हणून आर्थिक पिळवणूक होत नाही. दुसरीकडे मात्र लॉकडाऊन काळात ट्रॅव्हलचे मालक मनमानी पद्धतीने भाडे आकारत होते. लोकांना गरज असल्याने ट्रॅव्हल्सवाल्यांकडून मोठी आर्थिक पिळवणूक होत होती.
- विकास नवले, प्रवासी.