एसटीच्या ‘शिवशाही’ला तक्रारींचे ग्रहण, पुरेशा देखभाली अभावी प्रवाशांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 11:22 PM2017-11-21T23:22:59+5:302017-11-21T23:23:42+5:30
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने वातानुकूलित शिवशाही बस सुरु केल्या. मात्र या ‘शिवशाही’ची देखभालच होत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. घाटात एसटीतील वातानुकूलित यंत्रणा बंद पडणे, ब्रेक कमी लागणे, एसटीतील इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बंद पडणे आणि एसटीतील अस्वच्छता यांमुळे एसटीच्या शिवशाहीला तक्रारींचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. एसटी महामंडळाची ‘ड्रीम एसटी’ म्हणून ‘शिवशाही’ नावारुपास आली आहे. त्यामुळे पारंपरिक एसटीसह शिवशाहीत देखील प्रवाशांची गैरसोय असल्याने प्रवासीवर्गाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यात शिवशाही सध्या मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे आणि अन्य मार्गावर धावत आहे. शिवशाही सेवा पुरवण्यासाठी एसटी महामंडळाने ११ आॅपरेटरची नेमणूक केली आहे. मात्र बहुतांशी मार्गावरील शिवशाहीची देखभाल होत नाही. घाटात वातानुकूलित यंत्रणा बंद पडणे, एसटीतील इलेक्ट्रानिक यंत्रणा बंद असणे, अस्वच्छता, आसनव्यवस्था आरामदायी नसणे अशा तक्रारी प्रवाशांकडून प्राप्त होत आहेत. तर एसटी हीट होणे, ब्रेक कमी लागणे अशा तक्रारी संबंधित चालकांकडून महामंडळाकडे दाखल झाल्या आहेत.
शिवशाही एसटीची दुरुस्ती आणि देखभाल संबंधित आॅपरेटरकडे आहे.त्यामुळे एसटीतील मॅकेनिक देखील दुरुस्तीसाठी पुढे येत नाही. त्यामुळे प्रवाशांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. नुकतीच मुंबई-कोल्हापूर मार्गावरील शिवशाही मुंबईकडे परतत असताना हेडलाईट बंद पडल्याची बाब समोर आली आहे. पुणे आणि कोल्हापूर मार्गावरील शिवशाहीत सर्वाधिक तक्रारी आल्या असल्याची माहिती महामंडाळाच्या सूत्रांनी दिली.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात टप्याटप्याने एकूण दोन हजार शिवशाही बस येणार आहेत. मात्र पुणे आणि कोल्हापूर मार्गावरील शिवशाहीच्या प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होत आहे. त्यापैकी एसटी महामंडळाच्या ५०० आणि १५०० भाडेतत्वावरील असणार आहे. सद्यस्थितीत एसटी ताफ्यात १०७ शिवशाही एसटी ताफ्यात दाखल झाल्या आहेत. एसटीच्या वर्धापनदिनी ‘शिवशाही’ एसटी ताफ्यात दाखल झाली. परिहवन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मुंबई सेंट्रल येथे झालेल्या जंगी सामन्यात या सेवेचे लोकार्पण केले होते. मात्र शिवशाहीला सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच तक्रारींचे ग्रहण लागल्यामुळे उर्वरित शिवशाहीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
सर्व तक्रारींचे निराकरण होणार
महामंडळाने या तक्रारी निवारण्यासाठी तंत्रज्ञान, वाहतूक आणि नियोजन विभागाच्या अधिकाºयांची एक समिती नेमली आहे. ही समिती प्रत्यक्ष भेट देत तक्रारी जाणून घेत आहे. लवकरच तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे. संबंधित तक्रारी या लहान स्वरुपाच्या असून लवकरच त्या सोडवल्या जाणार आहे.
- रणजितसिंह देओल, एसटी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक