एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:07 AM2021-09-25T04:07:06+5:302021-09-25T04:07:06+5:30
मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि ...
मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन, या योजनेला ३१ डिसेंबर,२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे.
एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडित असलेल्या स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलतधारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने गर्दी होणारे कार्यक्रम उपक्रम राबविले जाऊ नये, असे निर्देश दिल्याने, तसेच अनेक ज्येष्ठ प्रवाशांना आगारात येऊन स्मार्ट कार्ड घेणे शक्य नसल्याने या योजनेला ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.