‘वीरपत्नीं’साठी एसटीचा आजीवन मोफत पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 05:45 AM2018-04-13T05:45:46+5:302018-04-13T05:45:46+5:30
देशाच्या सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या पत्नींसाठी एसटी महामंडळाने आजीवन मोफत प्रवास पास देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : देशाच्या सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या पत्नींसाठी एसटी महामंडळाने आजीवन मोफत प्रवास पास देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसर महामंडळाच्या सर्व बसमधून वीरपत्नींना राज्यभर मोफत प्रवास करता येईल. या निर्णयाची अंमलबजावणी १ मे अर्थात महाराष्ट्र दिनापासून करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या परिपत्रकात देण्यात आली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत वीरपत्नींचा अनोख्या पद्धतीने सन्मान करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यासाठी परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वीरपत्नींसाठी आजीवन मोफत पास देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध केले. वीरपत्नींच्या माहितीसाठी महामंडळाने सैनिक कल्याण विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. पत्रात जिल्हानिहाय सैनिक कल्याण अधिकारी यांची माहिती मागवण्यात आली आहे. ती संबंधित एसटी जिल्हा अधिकाऱ्यांना पाठवून वीरपत्नींसाठी आजीवन मोफत प्रवासी पास देण्यात येईल. याबाबत महाराष्टÑ एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले, या सुविधेमुळे शहीद जवानांना खºया अर्थाने श्रद्धांजली मिळेल तसेच वीरपत्नींचाही सन्मान होईल.