Join us

ज्येष्ठांसाठी एसटीची स्मार्ट कार्ड योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 4:56 AM

एसटीच्या बनावट कार्डला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे.

मुंबई : एसटीच्या बनावट कार्डला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. एसटीच्या मुंबई विभागाचे विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी ही योजना सुरू करण्यात आली.मुंबई सेंट्रल आगारात विनायक कांशीराम गुरव (७०) यांना स्मार्ट कार्ड नोंदणीची पावती देऊन या योजनेअंतर्गत ज्येष्ठांच्या नाव नोंदणीस सुरुवात झाली. विभागीय सांख्यिकी अधिकारी एकनाथ मगदूम, आगार प्रभारक श्रीरंग बरगे या वेळी उपस्थित होते. शासनाने विविध सामाजिक घटकांना एसटीमधून प्रवासाची सवलत दिली आहे. ज्येष्ठांना सवलतीचे साधे कार्ड मिळत असल्याने बनावट कार्ड बनवून अनेक जण या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आल्याने परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी स्मार्ट कार्ड योजनेची घोषणा केली.नाव नोंदणीवेळी स्मार्ट कार्डसाठी ५५ रुपये इतके शुल्क आकारण्यात येईल. नोंदणीसाठी वयाचा पुरावा व महाराष्ट्राचे नागरिक असल्याचा पुरावा सोबत आणावा लागणार आहे. त्यात वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट अशा कोणत्याही पुराव्यांपैकी एक आणि आधारकार्ड गरजेचे असल्याचे प्रशासनाने सांगितले.>येथे होणार नोंदणीज्येष्ठ नागरिकांना नावनोंदणी आगारातील आरक्षण खिडकीवर करण्यात येणार आहे. अंगठ्याचा ठसा स्कॅनरवर ठेवून आधार कार्डशी संलग्न माहिती दिल्यानंतरच नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर पंधरा दिवसांनी नोंदणी केलेल्या ठिकाणीच कार्ड मिळेल, अशी माहिती आगार व्यवस्थापक सुनील पवार यांनी दिली.