मुंबई - दिल्लीत गेल्या 55 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू असून आजपासून मुंबईतही हे आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी आझाद मैदान येथे दाखल झाला. विविध वाहनांतून हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले असून, सोमवारी जाहीर सभेने शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने निघणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनासंदर्भात राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी मोदींनी हेकेखोरपणा सोडावा, असे म्हटलंय. तसेच, आंदोलनाचा प्रश्न न सुटण्याला मोदींचा हेकेखोरपणाच पुन्हा आडवा आला, असेही कडू यांनी म्हटलंय.
मुंबईतील आझाद मैदानात होत असलेल्या आंदोलनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांसह दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. तर, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सांगलीतून ट्रॅक्टर मोर्चा काढून या आंदोलनात सहभागी होत आहेत. हजारो शेतकऱ्यांसह राज्यातील दिग्गज नेतेही आंदोलनात सहभागी होत आहेत. मात्र, भाजपाकडून या नेत्यांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांचा सहभाग म्हणजे निव्वळ ढोंगीपणा असल्याचं म्हटलंय. आता, पंकजा मुंडेंनीही सावध पवित्रा घेत सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले. मात्र, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोदींचा हेकेखोरपणाच आडवा आल्याचं सांगत, आतातरी मोदींनी प्रजाहिताचा निर्णय घ्यावा, असे सूचवले आहे.
बच्चू कडू यांनी शेतकरी आंदोलनाचा प्रश्न न सुटण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हेकेखोरपणाच कारणीभूत असल्याचं म्हटलंय. ''26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे, किमान या दिवशीतरी पंतप्रधानांनी प्रजेचं ऐकून निर्णय घ्यावा. आपण राजा नसून प्रजा हीच राजा आहे, असेही कडू यांनी म्हटलंय. मोदी सरकार हे विसरले आहे की आपण राजा नाही, प्रजा राजा आहे. शेतकरी राजाच्या मागण्या मान्य कराव्या नाहीतर याचे उग्र स्वरुप येत्या काळात बघायला मिळणार,'' असा इशाराही कडू यांनी मोदी सरकारला दिला आहे.
पंकजा मुंडे म्हणतात
शेतकरी आंदोलनाबाबत पंकजा मुंडे यांना विचारण्यात आलं असता, केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचंच सरकार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतले आहेत आणि आताही सरकार शेतकऱ्यांशी चर्चेची तयारी दाखवत आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. हा बळीराजाचा देश आहे, मोदींनी पीक विम्याचा, हमीभाव, शेतकऱ्यांना पेन्शन द्यायचा असे महत्त्वाचे निर्णय घेतले. सरकार सकारात्मक चर्चेसाठी तयार आहे. दोन्ही बाजूंनी सकारात्म चर्चा झाल्यास नक्कीच तोडगा निघेल. महाराष्ट्रात आंदोलन पोहोचायला तीन महिने का लागले, हा साधा प्रश्न आहे. शेतकरी बाजूला न राहता या आंदोलनात राजकारण येऊ नये, हा प्रयत्न सर्वांचाच असला पाहिजे, असेही पंकजा यांनी म्हटले.