बनावट स्टँप बाळगणा-याला अटक
By admin | Published: February 2, 2015 02:48 AM2015-02-02T02:48:50+5:302015-02-02T02:48:50+5:30
बनावट स्टँपद्वारे शासकीय कार्यालयांची कागदपत्रे तयार करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे.
नवी मुंबई : बनावट स्टँपद्वारे शासकीय कार्यालयांची कागदपत्रे तयार करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे अमृतसर व बटाला पोलीस अधीक्षक तसेच इतर कार्यालयांचे बनावट स्टँप आढळून आले आहेत.
गुन्हे शाखा कक्ष १ने शनिवारी घणसोली गाव येथे ही कारवाई केली. तेथे राहत असलेल्या एका व्यक्तीकडे शासकीय कार्यालयांचे बनावट स्टँप असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, उपनिरीक्षक भारत जाधव यांच्या पथकाने सापळा रचला होता. यावेळी मनजित सिंग (४३) याला अटक करण्यात आली.
घणसोली गावातील भवानी मंदिराजवळ सिंग हा एकटाच राहत होता. त्याच्या घराच्या झडतीमध्ये अमृतसर व बटाला येथील पोलीस अधीक्षकांची बनावट राजमुद्रा आढळली आहे. त्याशिवाय इतर शासकीय कार्यालयांचे देखील बनावट स्टँप सिंग याच्याकडे आढळले असल्याचे पोलीस निरीक्षक सिंग यांनी सांगितले. त्याशिवाय बनावट स्टँपद्वारे बनवलेले १२ वर्तणूक प्रमाणपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
याप्रकरणी सिंग याच्यावर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याच्याकडून
जप्त केलेली कागदपत्रे व स्टँप तपासणीसाठी पाठवले असल्याचे गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी सांगितले. त्याने हे स्टँप कोणाकडून घेतले याचाही तपास पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)