मुंबई : जेएनयूमधील हल्ल्याला सर्वस्वी गृहमंत्री अमित शहा जबाबदार असून त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा किंवा त्यांना पदावरून पायउतार करावे, अशी मागणी करत विद्यार्थी आणि नागरिकांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी मुंबईतील विविध संघटना, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक गेट वे आॅफ इंडियाजवळ एकत्र जमले आणि त्यांनी हल्ल्याच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने केली. काही विद्यार्थी आणि संघटना थेट निदर्शनाच्या जागी पोहोचल्या तर काही संघटनांनी हुतात्मा चौकापासून रॅलीला सुरुवात करून निदर्शनाच्या ठिकाणी पोहोचले.जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या या आंदोलनात छात्र भारती, जॅक मुंबई आणि इतर सर्व पुरोगामी संघटना, टीस, टीआयएफआर, मुंबई विद्यापीठ या शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांसह मिठीबाई, सेंट झेविअर्स, रूपारेल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. यामध्ये मोठ्या प्रमाणात सामान्य आणि स्थानिक नागरिकांनीही आपला सहभाग दर्शवत या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. देशात आतापर्यंत एनआरसी, सीएएविरोधात ज्या ज्या विद्यार्थ्यांनी, समाज सुधारकांनी आंदोलने केली आणि त्यांना अटक करण्यात आली; त्यांची सुटका करावी, अशी मागणीही यादरम्यान करण्यात आली. या मागण्यांप्रमाणे या हल्ल्यामागे जबाबदार असलेले तेथील चिफ सेक्रेटरी, चिफ प्रॉक्टर, कुलगुरू आणि अमित शहा यांची चौकशी व्हावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.अभाविपचे विद्यार्थी हुतात्मा चौकातहुतात्मा चौक परिसरात सोमवारी रात्री जेएनयूमधील हल्ल्याच्या निषधार्थ अभाविपतर्फे आंदोलन करण्यात आले. तसेच संघटनेच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी माटुंगा येथील रुईया महाविद्यालयाबाहेर आंदोलन केले. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथेच आंदोलन करणार असल्याचे मुंबई जिल्हा संघटन मंत्री सूरज लोकरे यांनी सांगितले.>वकील आणि डॉक्टरांचाही सहभागया निषेधाला सामान्य नागरिकांसह मोठे वकील, डॉक्टर्स यांनीही उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवित आम्ही विद्यार्थी नसलो तरी प्रथम देशाचे नागरिक आहोत आणि त्यामुळेच येथे हजर असल्याची प्रतिक्रिया दिली.निषेधाला कलाकार सुशांत सिंह राजपूत यानेही आपली हजेरी लावली. जेएनयूमधील हल्ला म्हणजे सरकारची दडपशाही असून याचा निषेधच आहे.हे सुडाचे राजकारण बंद होण्याची वेळ आली आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी अशाच प्रकारे एकत्र येऊन सामना करायला हवा, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.>रोहित पवारही सहभागीया निषेधाला राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही उपस्थिती दर्शविली. जेएनयूमध्ये हल्ला झाला त्या वेळी तेथील पोलीसही हल्ल्यात सामील होते की काय? अशी शंका येत असून या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.दिल्लीतील एचआरडी विभागाचे राज्यमंत्री महाराष्ट्राचे असून त्यांनी या संवेदनशील प्रकरणाबाबत लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. दिल्लीतील निवडणूक जवळ आहे. या पार्श्वभूमीवर हे हल्ले म्हणजे त्याचाच भाग तर नाही ना? अशी शंकाही त्यांनी या वेळी उपस्थित केली.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अशी परिस्थिती उद्भवू देणार नाही. मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय पोलीस यंत्रणेकडून अथवा इतर कोणाकडूनही होणार नाही याची खात्री त्यांनी या वेळी दिली. रोहित पवारांसोबतच छात्रभारतीचे कपिल पाटील, अबू आझमी, काँग्रेसचे संजय निरुपम यांनी या निषेध मोर्चाला आपली उपस्थिती दर्शविली.>राष्ट्रवादीची भाजप कार्यालयासमोर निदर्शनेमुंबई : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुंबईतील भाजपच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शनिवारी रात्री झालेला हा हल्ला पूर्वनियोजित होता हे लक्षात येत असून त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सोमवारी मुंबईतील भाजप कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करण्यात आला.>मुंबई विद्यापीठ बंदची हाकजेएनयूमधील विद्यार्थी, शिक्षकांवर रविवारी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ येत्या ८ जानेवारीला (बुधवार) देशभरातील विद्यापीठे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठ देखील बंद ठेवण्याची हाक देण्यात आली असल्याचे छात्र भारती संघटनेचे मुंबई अध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितले.>फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल!जेएनयू येथील हिंसाचारविरोधात गेट वे आॅफ इंडिया येथे आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या हातात ‘स्वतंत्र काश्मिर’चे बॅनर आढळून आले. याबाबतचा व्हिडीओ ट्विट करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.‘नेमके आंदोलन कशासाठी ? स्वतंत्र काश्मिरची घोषणाबाजी का? मुंबईत अशा प्रकारच्या फुटीरतावादी तत्वांना कसे काय सहन करायचे? मुख्यमंत्री कार्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटरवर स्वतंत्र काश्मिरच्या घोषणा दिल्या जात आहेत.आपल्या नाकाखाली देशविरोधी तत्वांनी स्वतंत्र काश्मिरची मोहिम चालवली आहे. ती आपण सहन करणार का, असा थेट सवाल फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केला आहे. याबाबतचा व्हिडीओसुद्धा त्यांनी आपल्या ट्विटला जोडला आहे.
जेएनयू हल्ल्याच्या विरोधात विद्यार्थी आक्रमक; गेट वे परिसरात निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 5:53 AM