Join us

स्लॅब कोसळल्याने विद्यार्थी जखमी

By admin | Published: April 10, 2017 6:25 AM

वांद्रे येथील सरकारी पॉलिटेक्निकल वसतिगृहात रविवारी सकाळी स्लॅब कोसळल्याने, एका विद्यार्थ्याच्या

मुंबई : वांद्रे येथील सरकारी पॉलिटेक्निकल वसतिगृहात रविवारी सकाळी स्लॅब कोसळल्याने, एका विद्यार्थ्याच्या डोक्याला सहा टाके पडल्याची घटना घडली. जखमी विद्यार्थ्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा वसतिगृहांच्या दुरवस्थेचा प्रश्न चर्चेत आला आहे. या घटनेमुळे वसतिगृहात राहाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सरकारी पॉलिटेक्निकल महाविद्यालयात सध्या दोन वसतिगृहे आहेत. यापैकी जे. जे. वसतिगृहातील खोली क्रमांक १०६ मधील स्लॅब रविवारी सकाळी कोसळला. या खोलीत राहाणाऱ्या वैभव मराठे याच्या डोक्याला जबर मार बसला असून, त्याला सहा टाके पडले आहेत. या घटनेनंतर वैभवर जवळच्या गुरुनानक रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर, त्याला घरी सोडण्यात आले. या प्रकरणानंतर पुन्हा एकदा वसतिगृहाच्या दुरवस्थेचा प्रश्न चर्चेत आला. युवासेनेने काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले होते. त्यानंतरही या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. या घटनेला शिक्षणमंत्री विनोद तावडे जबाबदार असल्याची टीका युवासेनेचे साईनाथ दुर्गे यांनी केली आहे. या संदर्भात पॉलिटेक्निकलच्या प्रशासनाशी संपर्क साधला असता, विद्यार्थ्याच्या डोक्याला किरकोळ मार लागला आहे, असे सांगण्यात आले. जवळच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले असून, त्याला सर्व आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले. (प्रतिनिधी)