Join us

‘त्या’ विद्यार्थिनीला आयआयटीची डीग्री नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 2:05 AM

उच्च न्यायालय : लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे शारीरिक अपंगत्व नसल्याचा निर्वाळा

मुंबई : लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे शारीरिक अपंगत्व नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने डास्कलक्लिया असलेल्या विद्यार्थिनीला आयआयटीला डीग्री देण्याचे निर्देश देण्यास नुकताच नकार दिला. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे विद्यार्थिनीने आयआयटीमधून मास्टर कोर्स पूर्ण केला असला तरी तिला डीग्री मिळणार नाही.डास्कलक्लियाची समस्या असलेल्या व्यक्तींना मेंदूतील समस्येमुळे गणिती ठोकताळे मांडणे अवघड जाते. सुजाता माने (बदललेले नाव) हिलासुद्धा डास्कलक्लिया आहे. ही लर्निंग डिसॅलिबिटी असून, या अपंगत्वालाही शारीरिक अपंगत्वामध्ये गणले जावे, यासाठी सुजाता हिने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. एम.एस. संकलेचा व न्या. ए.के. मेनन यांच्या खंडपीठापुढे नुकतीच या याचिकेवर सुनावणी होती.आयआयटी मुंबईने सुजाताला शारीरिक अपंगत्व असलेल्यांसाठी असलेल्या कोट्यातून ‘मास्टर आॅफ डिझाइन प्रोग्रॅम’ या कोर्ससाठी प्रवेश देण्यास नकार दिला. आयआयटीच्या म्हणण्यानुसार, सुजाताने तिच्या अर्जात लर्निंग डिसॅबिलिटीसंबंधी काहीही नमूद केले नव्हते.तिने सर्वसाधारण श्रेणीतून अर्ज भरला होता. मात्र, या श्रेणीसाठी प्रवेश मिळविण्याकरिता जेवढे गुण आवश्यक आहेत, तेवढे गुण तिला मिळाले नाहीत. त्यामुळे ती या अभ्यासक्रमासाठी पात्र नाही. आॅनलाइन फॉर्म भरताना लर्निंग डिसॅबिलिटी असलेल्यांसाठी काही पर्यायच उपलब्ध नव्हता. त्यामुळे आपण सर्वसाधारण श्रेणीतून अर्ज भरला, असा युक्तिवाद सुजाताच्या वकिलांनी खंडपीठासमोर केला.सुजाताने २०१२मध्ये ही याचिका दाखल केली आहे. त्या वेळी न्यायालयाने वेळोवेळी अंतरिम दिलासा देत आयआयटीला सुजाताला वर्गात बसण्याचे व परीक्षा देण्यास परवानगी देण्यासंदर्भात निर्देश दिले. त्यामुळे सुजाताचा डीग्री कोर्स पूर्ण झाला. याचिकाकर्तीने आयआयटी डीग्री कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला असला तरी आम्ही तिला आणखी दिलासा देऊ शकत नाही. डास्कलक्लिया म्हणजे एकप्रकारे शारीरिक अपंगत्व, हा याचिकाकर्तीचा युक्तिवाद आम्ही स्वीकारू शकत नाही. डास्कलक्लिया हा मानसिक प्रक्रियेवर परिणाम करणारा आहे, असे न्यायालयाने म्हणत याचिकाकर्तीला आयआयटीची डीग्री देण्यास नकार दिला.

टॅग्स :शैक्षणिक