मुंबई : मुले पळवणारी टोळी सक्रिय झाल्याच्या अफवांनी पालकांचा जीव टांगणीला लागलेला असतानाच परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे स्वत:च्याच अपहरणाचा बनाव एका विद्यार्थ्याने रचल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
घाटकोपर परिसरात राहणाऱ्या ११ वर्षीय रोहनने (नाव बदलले आहे) हा प्रताप केला. रोहनची नुकतीच परीक्षा संपली, मात्र परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे शिक्षकांनी ओरडण्यास सुरुवात केली. अशात अपहरणाचे ऐकून त्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. बुधवारी सकाळी शाळेत जात असताना आपल्याला दोघांनी रिक्षात कोंबून तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी झटापट करत पळ काढून शाळा गाठली असे त्याने शाळेत सांगितले. शाळेने घाटकोपर पोलिसांत तक्रार दखल केली.
असा झाला उलगडा...पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासले, शेकडो रिक्षाही तपासल्या. मुलाच्या जबाबात सतत बदल होत असल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी त्याला विश्वासात घेत चौकशी करताच त्याने अपहरणाचा बनाव केल्याचे पोलिसांना सांगितले.