Join us

आजीच्या भेटीसाठी विद्यार्थिनीने रचला अपहरणाचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 5:38 AM

आजीला भेटून घरी यायला उशीर झाला, म्हणून घाटकोपरच्या सातवीच्या विद्यार्थिनीने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव केल्याचे तपासात समोर आले

मुंबई : आजीला भेटून घरी यायला उशीर झाला, म्हणून घाटकोपरच्या सातवीच्या विद्यार्थिनीने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी तिच्याकडे उलटतपासणी करताच, तिने याबाबत कबुली दिली.घाटकोपरच्या भटवाडी येथील शाळेत नेहा (नावात बदल) सातवीचे शिक्षण घेते. सोमवारी दुपारी ३च्या सुमारास शाळेच्या आवारातून तीन तरुणांनी तिचे अपहरण केले. त्यानंतर, रिक्षातून पळवून नेत असताना, आपण चालत्या रिक्षातून असल्फा मेट्रो स्टेशनखालील परिसरात उडी मारल्याचे कुटुंबीयांना सांगितले. कुटुंबीयांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, घाटकोपर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तीन अनोळखी व्यक्तिंविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरूकेला.काही सामाजिक संस्थांनीही घटनेचा निषेध नोंदवित, आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी भेटी सुरू केल्या. त्यामुळे आरोपींचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान बनले होते. त्यांनी परिसराचा आढावा घेतला. तेव्हा तेथील परिस्थितीजन्य पुराव्यांवरून, अपहरणाबाबत पोलिसांना संशय आला. त्यांनी विद्यार्थिनीला विश्वासात घेत उलटतपासणी केली, तेव्हा केवळ आजीला भेटण्यासाठी अपहरणाचा बनाव केल्याची कबुली तिने पोलिसांना दिली.शाळेपासून काही अंतरावरच आजी राहाण्यास आहे. मात्र, तिच्या घरी जाण्यासाठी कुटुंबीयांचा विरोध होता. सोमवारी नेहा घरच्यांना न सांगता आजीकडे गेली. तिथे मजामस्ती केली. घरी निघायला ८ वाजले. अशात आजीकडे गेली, म्हणून कुटुंबीयांकडून ओरडा बसेल, म्हणून तिने हा बनाव केल्याचे पोलिसांना सांगितले.