Join us

विद्यापीठ वसतिगृहातील विद्यार्थिनी जुलाबाने हैराण; दूषित पाण्यामुळे त्रास झाल्याचा अंदाज

By रेश्मा शिवडेकर | Published: April 20, 2024 10:14 AM

हॉस्टेलमधील एखाद्या कुलरमधील खराब पाण्यामुळे हा त्रास झाला असावा, असा विद्यार्थिनींचा अंदाज आहे.

रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील न्यू गर्ल्स हॉस्टेलमधील ५० हून अधिक विद्यार्थिनींना गुरुवारी रात्रीपासून अचानक पोटदुखी, जुलाबाचा त्रास जाणवू लागल्याची तक्रार आहे. या हॉस्टेलमध्ये खाणावळ नाही. त्यामुळे मुलींना होणाऱ्या त्रासाचे कारण कळू शकले नाही. हॉस्टेलमधील एखाद्या कुलरमधील खराब पाण्यामुळे हा त्रास झाला असावा, असा विद्यार्थिनींचा अंदाज आहे.

विद्यापीठातील आरोग्य केंद्र चारच्या सुमारास बंद होते. त्यामुळे अनेक मुलींना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. काहींनी स्वत:जवळील औषधे खाऊन वेळ मारून नेली. तर काहींनी कॅम्पसबाहेरील डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले. तर काहींना अशक्तपणा आल्याने डॉक्टरांकडे जाणेही शक्य झाले नाही. आजारपण अंगावर काढल्याने एका मुलीला तब्बल १६ वेळा जुलाब झाल्याची माहिती एका विद्यार्थिनीने दिली. दोन वर्षांपूर्वी हे हॉस्टेल सुरू झाले. पण अजूनही हॉस्टेलमध्ये खाणावळ नाही. त्यामुळे हा त्रास आम्हाला कशामुळे झाला, हे समजायला मार्ग नाही, असे एका मुलीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

मुलींच्या सामाईक व्हॉट्सॲप ग्रुपवर साधारणपणे ५० मुलींनी पोटदुखी, मळमळ, जुलाब होत असल्याच्या तक्रारी नोंदवल्याची माहिती तिने दिली. परीक्षा तोंडावर आहेत. काहींचे प्रोजेक्ट सबमिशन आहे. जुलाब आणि पोटदुखीने हैराण असल्याने आम्ही ते कसेबसे पूर्ण करत आहोत, अशी माहिती आणखी एका विद्यार्थिनीने दिली.

फोनवर चौकशी केली- मुख्य म्हणजे इतके सगळे होऊन हॉस्टेलपासून काही अंतरावर राहणाऱ्या वॉर्डननी दिवसभरात विद्यार्थिनींची भेट घेऊन त्यांची साधी विचारपूसही केलेली नव्हती.  - याबाबत वसतिगृहाच्या वॉर्डन मधुरा कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मुलींना उष्णतेमुळे त्रास जाणवत असल्याचा अंदाज वर्तवला. तसेच, फक्त २० मुलींनाच त्रास होत असल्याचा दावा केला. - सकाळपासून मुली तक्रार करत आहेत. मी त्यांची फोनवरून चौकशी केली. काहींना डॉक्टरांचे मोबाइल क्रमांक पुरवल्याची माहिती त्यांनी दिली. मी आता हॉस्टेलमध्ये जाऊन माहिती घेणार आहे, असे त्यांनी रात्री आठच्या सुमारास सांगितले. 

टॅग्स :मुंबईमुंबई विद्यापीठविद्यार्थी