टोईंग व्हॅनच्या धडकेत विद्यार्थिनी जखमी, चालकाविरोधात गुन्हा दाखल
By गौरी टेंबकर | Published: July 5, 2024 01:03 PM2024-07-05T13:03:51+5:302024-07-05T13:04:08+5:30
वांद्रे पोलिसांच्या हद्दीत एका टोईंग व्हॅनच्या धडकेत जॉईलीन डिसूजा (१४) ही इयत्ता नववीमध्ये शिकणारी मुलगी जखमी झाली.
मुंबई: वांद्रे पोलिसांच्या हद्दीत एका टोईंग व्हॅनच्या धडकेत जॉईलीन डिसूजा (१४) ही इयत्ता नववीमध्ये शिकणारी मुलगी जखमी झाली. त्यानुसार चालकाच्या विरोधात तिचे वडील विल्सन (४२) यांनी तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार विल्सन हे रिक्षाचालक आहेत तर त्यांची मुलगी वांद्रे पश्चिम परिसरात असलेल्या बी जे रोड याठिकाणी एका कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये शिकते. ते २ जुलै रोजी फादर एग्नल शाळेच्या गेट समोर रिक्षा थांबवून उभे होते. त्याचवेळी त्यांच्यासमोरून भरधाव वेगात एक टोइंग व्हॅन गेली. या व्हॅनच्या चालकाने अचानक ब्रेक मारल्याने त्याचा धक्का जॉईलीनला लागला. त्यामुळे ती रस्त्यावर पडली आणि तिच्या डोक्याला डाव्या बाजूला मुका मार लागला.
हाताचा पंजा ही खरचटला आणि ती जागीच बेशुद्ध झाली. तेव्हा विल्सन यांनी लगेचच तिला उपचारासाठी भाभा रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार देत तिला के ई एम रुग्णालयात हलवण्यास सांगितले. तिथून उपचार घेऊन ३ जुलै रोजी विल्सन यांनी वांद्रे पोलिसात टोइंग व्हॅन चालका विरोधात तक्रार दिली. त्यानुसार वांद्रे पोलिसांनी याप्रकरणी बीएनएस कायद्याचे कलम १२५,१२५(ए),२८१ मोटर वाहन अधिनियम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.