मजामस्तीत शाळेच्या मैदानातच विद्यार्थ्याने विद्यार्थ्याला पेटविले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 01:07 AM2019-02-16T01:07:22+5:302019-02-16T01:07:41+5:30
मधल्या सुट्टीत शाळेच्या मैदानात सहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये मजामस्ती सुरू झाली. याचदरम्यान मैदानात पडलेले अॅसीटोन वर्गमित्राच्या अंगावर फेकून त्याला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार साकीनाका येथील पालिका शाळेच्या आवारात घडला.
- मनीषा म्हात्रे
मुंबई : मधल्या सुट्टीत शाळेच्या मैदानात सहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये मजामस्ती सुरू झाली. याचदरम्यान मैदानात पडलेले अॅसीटोन वर्गमित्राच्या अंगावर फेकून त्याला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार साकीनाका येथील पालिका शाळेच्या आवारात घडला. सुदैवाने शर्टाला लागलेली आग तत्काळ विझविल्यामुळे वर्गमित्र थोडक्यात वाचला. या प्रकरणी अॅसीटोन फेकणाऱ्या विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करत, साकीनाका पोलीस अधिक तपास करीत आहेत.
नूर मोहंमद महेबुब गडकरी (१३) असे या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. साकीनाक्यातील काजूपाडा येथील पालिका शाळेत तो सहावी इयत्तेत शिक्षण घेत आहे. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला. १० वाजता मधली सुट्टी होताच, वर्गमित्रासोबत खेळण्यासाठी शाळेच्या मैदानात आला. त्याचदरम्यान मित्राने मैदानात पडलेली अॅसीटोनची बाटली उचलली आणि खेळता खेळता ते अॅसीटोन गडकरीच्या अंगावर फेकले. त्यानंतर काडीपेटीने त्याला पेटविले. शर्टाने पेट घेताच, गडकरी घाबरला. आरडाओरड करत त्याने हाताने आग विझवली. त्यामुळे तो थोडक्यात वाचला. यामध्ये त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्याने याबाबत वर्गशिक्षकांना माहिती देताच त्यांनी संबंधित मुलाला दम देत, पालकांना घेऊन येण्यास सांगितले.
दुपारी १ च्या सुमारास गडकरी जखमी अवस्थेत घरी येताच, आजीने कामावर गेलेल्या त्याच्या आईला बोलावून घेतले. आईने त्याला विश्वासात घेत चौकशी केल्यानंतर त्याने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी शाळेत धाव घेत, विचारणा केली. मात्र तोपर्यंत शिक्षक निघून गेले होते. अखेर, सायंकाळी साकीनाका पोलीस ठाणे गाठून त्यांनी तक्रार दिली. आई रुक्साना गडकरी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भीतीने मुलगा शाळेतच आला नाही
अॅसीटोन टाकणाºया मुलाकडे अॅसीटोन तसेच काडीपेटी कशी आली? त्याने असे का केले? या प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी साकीनाका पोलिसांनी शुक्रवारी शाळेत चौकशी केली. तेव्हा, मुलगा भीतीने शाळेतच आला नसल्याचे समजले. तो आजीकडे राहतो. त्याचे आईवडील बाहेरगावी असतात. त्यात अल्पवयीन असल्याचे त्याला पोलीस ठाण्यात आणता येत नाही. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याचे, साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सावंत यांनी सांगितले.