मुंबई : मुंबई विद्यापीठाने निकाल लवकर लावण्यासाठी आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा पर्याय निवडला होता. पण यामध्ये विद्यापीठ सपशेल नापास झाले आहे. विद्यापीठाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. कलिना कॅम्पसच्या प्रवेशद्वारापाशी शुक्रवारी स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियाच्या (एसएफआय) कार्यकर्त्यांनी मुंडण केले.मुंबई विद्यापीठाने १५ आॅगस्टपर्यंत निकाल जाहीर करण्याचा शब्ददेखील पाळला नाही. त्यामुळे आता दीड लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. त्यामुळे आज विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर एसएफआयने मुंडण आंदोलन केले. निकालाच्या गोंधळाला कारणीभूत असलेल्या कुलगुरूंनी तसेच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी एसएफआयने केल्याचे एसएफआयचे मुंबई जिल्हा अध्यक्ष विमलेश राजभर यांनी केली. दुसरीकडे मुंबई काँगे्रसने विद्यापीठाविरुद्ध सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. शनिवारपासून सर्व महाविद्यालयांबाहेर सह्यांची मोहीम राबविली जाणार आहे. शनिवारी सकाळी साडे दहा वाजल्यापासून ठाकूर महाविद्यालयाबाहेरून सह्यांची मोहीम सुरू होणार आहे.दरम्यान, विद्यापीठाने निकालाची तिसरी डेडलाइन चुकवल्यानंतर पुन्हा राज्यपालांनी प्रभारी कुलगुरूंसह अन्य अधिकाºयांची बैठक बोलावली होती. त्यानंतर कलिना कॅम्पसमध्ये एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत निकालाचा आढावा घेतला. जबाबदारी आणि अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली.
विद्यार्थी संघटना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 6:05 AM