उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून निर्णय लवकर घेण्याची अपेक्षामुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा मोठा फटका शिक्षण क्षेत्राला बसला असून विदयार्थ्यांच्या शैक्षणिक वेळापत्रकावर याचा परिणाम झाला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या बाबतीत शिक्षण विभागाचा निर्णय झाला असला तरी विद्यापीठाच्या आणि संलग्न महाविद्यालयातील परीक्षांचा निर्णय अद्याप बाकी आहे. राज्यातील विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षा रद्द झालेल्या नाहीत त्याबाबतीत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. मात्र पहिल्या व दुसऱ्या वर्षाच्या परीक्षा तसेच शेवटच्या वर्षाच्या परीक्षा महत्त्वाच्या असल्याने , त्यावर विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य अवलंबून असल्याने अद्याप या परीक्षांच्या बाबतीत निर्णय न झाल्याने पालक - विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द झाल्यानंतर विद्यापीठांच्या इतर परीक्षा रद्द झाल्या, अशाप्रकारचे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच यापूर्वीही विद्यापीठाच्या लेटरहेडवरून चुकीची वेळापत्रके व्हायरल झाली असून परीक्षा रद्द झाल्याच्या चुकीच्या बातम्या पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठांच्या परीक्षा होणारच असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील परीक्षांच्या बाबतीत काय आणि केव्हा निर्णय होणार याकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई या विद्यापीठांचे कुलगुरू, संचालक, उच्चशिक्षण विभागाचे अधिकारी यांची समिती नेमण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग परीक्षा व अध्यापनातील गुणवत्तेसंदर्भात समन्वय व देखरेखीचे काम करतो. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यूजीसीने नेमलेल्या समितीचा अहवाल अद्याप सादर झालेला नाही. हा अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहे. परीक्षा आणि शैक्षणिक कॅलेंडरबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर राज्यस्तरीय समितीच्या शिफारशींच्या आधारे निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता विद्यापीठ अनुदान आयोगाचा अहवाल येईपर्यंत विद्यार्थी पालकांना वाट पहावी लागणार आहे. परीक्षा होणार की नाही, झाली तर कधी होईल, कशी होईल असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेची ही कोंडी फोडावी अशी मागणी पालक विद्यार्थी करत आहेत.