Join us

‘त्या’ संस्थेकडून पुन्हा होतेय विद्यार्थी-पालकांची फसवणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 2:18 AM

अंधेरीतील संस्था : कारवाईनंतरही दुसऱ्या विद्यापीठाकडून मान्यता घेऊन अभ्यासक्रम चालविण्याचा प्रयत्न

मुंबई : मुंबई आणि पुण्यात चालणाºया अनधिकृत आणि बोगस नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इव्हेंट मॅनेजमेंट या शैक्षणिक संस्थेवर तंत्रशिक्षण संचालनालयाकडून एकदा कारवाई झाल्यानंतरही आता या संस्थेने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत अभ्यासक्रम चालविण्याची परवानगी मिळविली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार आता ही शैक्षणिक संस्था यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची फसवणूक करत असून पुन्हा एकदा विद्यार्थी आणि पालकांकडून अनधिकृत अभ्यासक्रमासाठी पैसे उकळत असल्याचा दावा करत मनविसेकडून मुक्त विद्यापीठाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इव्हेंट मॅनेजमेंट, अंधेरी या शैक्षणिक संस्थेचा यूजीसीच्या अनधिकृत/ बोगस विद्यापीठांच्या यादीत समावेश करण्यात आला होता. एनआयईएमविरोधात तक्रारी दाखल झाल्या तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने थेट विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये या शैक्षणिक संस्थेच्या संचालकांना या संदर्भात पत्र दिले व ही संस्था तत्काळ बंद करावी आणि विद्यार्थ्यांची फसवणूक थांबविण्याचा इशारा दिला होता. तसेच या संस्थेमधील एमबीए / पीजीडीएम (इव्हेंट मॅनेजमेंट) व डिप्लोमा (इव्हेंट मॅनेजमेंट) या अभ्यासक्रमांना अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद यांची मान्यता नसल्याची तक्रार संचालनालयाकडे प्राप्त झाली होती. या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षण संचालनालयाच्या मुंबई विभागीय कार्यालयाकडून त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आणि चौकशी करण्यात आली. या चौकशी समितीच्या अहवालावरून तंत्रशिक्षण संचालनालयाकडून सुनावण्याही घेण्यात आल्या आणि कारवाईस्तव २०१३ च्या महाराष्ट्र अधिनियमाच्या अनधिकृत संस्थांच्या नियमावलींचा आधार घेत नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इव्हेंट मॅनेजमेंटमधील अनधिकृत अभ्यासक्रम तत्काळ बंद करण्याचे निर्देश संचालनालयाकडून देण्यात आले होते.यानंतर या शैक्षणिक संस्थेकडून आता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून अभ्यासक्रम चालविण्यासाठी परवानगी घेण्यात आली. या प्रकारात विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याचा आरोप मनविसेकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्याधीशांकडून करण्यात यावी आणि संबंधितावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी मनविसेचे सुधाकर तांबोळी यांच्याकडून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे करण्यात आली आहे. तसेच त्या अधिकाºयावरही कारवाई करण्याची मागणी मनविसेचे सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी केली आहे.दरम्यान, मनविसेने विद्यापीठाकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर या शैक्षणिक संस्थेच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल येईपर्यंत या संस्थेच्या कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश देऊ नये आणि नोंदणी घेऊ नये, असे निर्देश विद्यार्थी सेवा विभागाला देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.मान्यतेबाबत गुरुवारी अंतिम निर्णयएनआयईएम संस्थेकडून आमच्या परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच काही प्रवेश घेण्यात आले होते. त्यामुळे आम्हाला विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणे हितावह वाटले नाही. मात्र या संस्थेसंदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर आणि त्यांचे अधिकृतपणाचे दावे फोल ठरल्यानंतर आता आमच्याकडून गुरुवारी त्यांच्या मान्यतेबद्दल पुन्हा शेवटचा निर्णय घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची फसवणूक होणार असेल तर निश्चितच ही मान्यता रद्द करणार आहोत.- एताकुला वायुनंदन, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

टॅग्स :मुंबई