विद्यार्थी ‘आधार’ सक्तीमुळे मुख्याध्यापक त्रस्त; आदेश मागे घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 01:46 AM2017-10-01T01:46:47+5:302017-10-01T01:47:13+5:30
शाळेत शिकणा-या प्रत्येक विद्यार्थ्याचे आधार कार्ड असणे सक्तीचे करण्यात आले आहे. राज्यभरातील शाळांमध्ये हा निर्णय लागू करण्यात आला असून, त्याचा संबंध विद्यार्थ्याच्या संचमान्यतेशी जोडला आहे.
मुंबई : शाळेत शिकणा-या प्रत्येक विद्यार्थ्याचे आधार कार्ड असणे सक्तीचे करण्यात आले आहे. राज्यभरातील शाळांमध्ये हा निर्णय लागू करण्यात आला असून, त्याचा संबंध विद्यार्थ्याच्या संचमान्यतेशी जोडला आहे. त्यामुळे मुंबईतील मुख्याध्यापकांमध्ये नाराजी सूर उमटू लागला आहे. राज्य शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा फटका मुंबईतील काही शाळांना बसणार असल्याचे चित्र आहे.
मुंबईतील शाळांमधील विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड असली, तरी संचमान्यतेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयानुसार जितक्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सरलमध्ये अपलोड करण्यात आले आहेत, तेवढेच विद्यार्थी संचमान्यतेसाठी ग्राह्य धरले जाणार असल्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. या निर्णयामुळे मुंबईतील शेकडो शाळांना फटका बसणार असून, त्यामुळे शिक्षकांची संख्याही कमी होण्याची भीती मुख्याध्यापकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
आदेश मागे घेण्याची मागणी
आधार कार्डबाबत अधिकारी वर्गातही याबाबत संभ्रमावस्था आहे. आधार कार्डची जबाबदारी पालकांची असतानादेखील त्याचा फटका शाळांना कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करीत, हा आदेश मागे घेण्याची मागणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केल्याचे, मुंबई माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी सांगितले.