विद्यार्थिनीवर शिपायाकडून अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 05:27 AM2018-04-24T05:27:05+5:302018-04-24T05:27:05+5:30
सेंट पीटर्स हायस्कूल, माझगाव येथील शाळेत घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे पालक वर्गासह नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई : एका ४ वर्षीय अल्पवयीन मुलीशी शाळेतील एका महिला शिपायानेच अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना माझगावमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित मुलीच्या पालकांकडून शाळेत, तसेच पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. मात्र, अद्याप शाळेकडून त्या महिला शिपायाला शाळेतून काढण्याशिवाय इतर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. भायखळा पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून सोमवारी रात्री महिलेला अटक केली.
सेंट पीटर्स हायस्कूल, माझगाव येथील शाळेत घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे पालक वर्गासह नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची ४ वर्षांची मुलगी पोटदुखीचे कारण सांगून शाळेत जाण्यास नकार देत होती. पालकांनी तिला रुग्णालयात चाचणीसाठी नेले असता, तिच्या खासगी भागांवर काही जखमा आढळल्या. त्यानंतर चौकशी केली असता, तिच्या शाळेतील महिला शिपाई तिच्या गुप्तांगाशी चाळे करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. याची तक्रार त्यांनी शाळेला केली आणि कारवाई करण्यास सांगितले.
या संदर्भात शाळेने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला शिपाई शाळेत गेल्या २५ वर्षांपासून काम करत होती. मात्र, तिच्या संदर्भात तक्रार नव्हती. यानंतर शाळेने पालक शिक्षक सभा घेऊन त्या महिला शिपायाला बडतर्फ केले आहे. पालक संबंधित शिपायावर आवश्यक ती कारवाई करू शकतात, असे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, पालकांकडून महिला शिपायावर भायखळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
मालवणीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खेळण्यासाठी घरी बोलवून सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा प्रकार रविवारी मालवणीत घडला. या प्रकरणी पोलिसांनी १३ वर्षांच्या मुलाला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.
रविवारी दुपारी मालवणीतील आंबोजवडी परिसरात हा प्रकार घडला. सहा वर्षांच्या नेहाला (नावात बदल) रविवारी राजू (नावात बदल) याने खेळण्याच्या बहाण्याने स्वत:च्या घरी नेले. त्या ठिकाणी त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. त्यामुळे नेहा घाबरली व तिने आरडाओरडा केला. त्यामुळे राजूदेखील घाबरला आणि नेहाला त्याने सोडून दिले. तिने घडला प्रकार पालकांना जाऊन सांगितला. तेव्हा त्यांनी मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी राजूला ताब्यात घेत, नेहाला शताब्दी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले, ज्यात तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघड झाले.