अंतिम सत्रातील परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी संघटना आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 06:54 PM2020-06-06T18:54:59+5:302020-06-06T18:55:15+5:30
विभिन्न मतांमुळे अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा तिढा वाढला आहे. आधीच कोरोनामुळे अस्वस्थ असलेले विद्यार्थी परीक्षा होणार की नाही या प्रश्नामुळे प्रचंड मानसिक तणावाखाली आले आहेत.
मुंबई : राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यामधील विभिन्न मतांमुळे अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा तिढा वाढला आहे. आधीच कोरोनामुळे अस्वस्थ असलेले विद्यार्थी परीक्षा होणार की नाही या प्रश्नामुळे प्रचंड मानसिक तणावाखाली आले आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थी भारती , छात्रभारती सारख्या समविचारी संघटनांनी एकत्र येऊन अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा शासन निर्णय जारी करावा यासाठी सोशल मीडियावर एक मोहिमी हाती घेतली आहे. राज्याचे राज्यपाल विद्यार्थ्यांना च्या हिताचा विचार करत नसतील त्यांची पदावरून हक्कलपट्टी करावी यासाठी #राज्यपाल_हटवा_महाराष्ट्र_वाचवा ही मोहीम हाती घेतली आहे. तसेच राज्यातील अंतिम सत्रातील एटीकेटी आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट पस करून पुढील वर्गात प्रवेश देण्याची मागणी या संघटनांनी केली असल्याची माहिती विद्यार्थी भारतीच्या राज्याध्यक्षा मंजिरी धुरी यांनी दिली.
१० लाख विद्यार्थ्यांना कोरोना झालाच तर त्याची जबाबदारी, परीक्षा घेण्याचा अट्टाहास असलेले राज्यपाल स्वतः घेतील का? असा सवाल विद्यार्थी भारतीचे राज्य कार्याध्यक्ष प्रणय घरत यांनी उपस्थित केला. कोरोनाच्या वाढत्या प्रॅदुर्भावावर नियंत्रण कसे मिळविता येईल याचा विचार सरकारने करायचा की परीक्षांचे नियोजन करून त्याचा प्रादुर्भाव आणखी पसरवायचा असा सवाल करत सरकार व राज्यपालांच्या राजकारणात विद्यार्थ्यांचा बळी देऊ नका अशी प्रतिक्रिया राज्यकार्यवाह श्रेया निकाळजे यांनी दिली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परीक्षा रद्द करून सरासरी गुणांच्या आधारे निकाला लावण्याचा निर्णय घेतल्यावर त्याला राज्यपालांनी केवळ राजकारण म्हणून आक्षेप घेतला असेल तर विद्यार्थी हिताच्या दृष्टीने ते अत्यन्त चुकीचे आहे. याचमुळे राज्यपालाविरोधात सोशल मीडियावर ही मोहीम चालविणार असल्याची माहिती छात्रभारतीचे सचिन बनसोड यांनी दिली. तर कोरोनाच्या काळातही परीक्षा घेतल्या गेल्या, तर विद्यार्थी भारतीतर्फे राज्यपालांच्या बंगल्यावर "झोप मोड आंदोलन" करण्यात येईल व परीक्षांवरही बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा मंजिरी धुरी यांनी दिला आहे.