अफगाणिस्तानमधील विद्यार्थ्यांची आयआयटीमधील शिक्षणाची संधी हुकणार नाही ...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:11 AM2021-08-17T04:11:10+5:302021-08-17T04:11:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सद्य:स्थितीत अफगाणिस्तान येथील परिस्थिती भयावह आहे. आयआयटी मुंबई येथे शिकणाऱ्या अफगाणिस्तानमधील विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबई ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सद्य:स्थितीत अफगाणिस्तान येथील परिस्थिती भयावह आहे. आयआयटी मुंबई येथे शिकणाऱ्या अफगाणिस्तानमधील विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबई संकुलात येऊन राहण्याची परवानगी संचालकांकडे मागितली होती. संचालक सुभाशिष चौधरी यांनी परवानगी दिली आहे. सद्य:स्थितीचा आढावा घेतला असता तेथील विमानसेवा बंद करण्यात आली आहे. ते विद्यार्थी यंदाच्या शैक्षणिक वर्षात जरी शिक्षण घेऊ शकले नाहीत, तरी ते भविष्यात संस्थेत येऊन आपले शिक्षण पुन्हा सुरू करू शकतात. त्यांची अभ्यासक्रमाची जागा आरक्षित ठेवली जाईल, अशी माहिती चौधरी यांनी दिली.
आयआयटी मुंबईत अफगाणिस्तान येथील ११ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दोन विद्यार्थी आयआयटी संकुलात आहेत. नऊ विद्यार्थी अद्यापही अफगाणिस्तानात आहेत. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. आयआयटी मुंबईत शिकण्यासाठी आणि प्रवेशासाठी मोठी स्पर्धा असते. यंदा इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स (आयसीसीआर)च्या शिष्यवृत्ती अंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमाला काही अफगाणी विद्यार्थ्यांना संस्थेकडून प्रवेश देण्यात आला आहे. कोरोना काळात हे विद्यार्थी घरूनच ऑनलाईन शिक्षण घेत होते. अचानक तेथील चिघळलेल्या परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांनी संकुलात येण्याची परवानगी मागितली होती. या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईकडून त्या विद्यार्थ्यांना परवानगी देण्यात आली आहे. मुंबईतील आयआरसीसी कार्यालय त्यांच्या व्हिसा आणि इतर कार्यवाहीसाठी प्रयत्न करत असल्याची माहिती चौधरी यांनी दिली.
अफगाणिस्तानसारख्या देशातून या विद्यार्थ्यांची येथील शिक्षणासाठी निवड झाली असल्याने त्यांची शिक्षणाची संधी अबाधित राहावी यासाठी आयआयटी मुंबईकडून त्यांची जागा अबाधित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संचालक सुभाशिष चौधरी यांनी सांगितले.