आज विद्यार्थ्यांचा पुन्हा एल्गार, ‘मुंबई विद्यापीठ वाचवा’ आंदोलन, मेरिट ट्रॅक कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 02:56 AM2017-10-31T02:56:27+5:302017-10-31T02:56:48+5:30
मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीनंतर निकालांना लेटमार्क लागला, पण तरीही हिवाळी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने होणार असल्यामुळे विद्यार्थी संतापले आहेत.
मुंबई : मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीनंतर निकालांना लेटमार्क लागला, पण तरीही हिवाळी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने होणार असल्यामुळे विद्यार्थी संतापले आहेत. मेरिट ट्रॅक कंपनीचे कंत्राट रद्द करा, सर्व परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने करू नका, या प्रमुख दोन मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी विद्यार्थी कलिना कॅम्पसमध्ये मंगळवारी दुपारी आंदोलन करणार आहेत. सर्व विद्यार्थी एकवटून विद्यापीठाकडे न्याय मागणार असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.
जून महिन्यापासून सुरू झालेला विद्यापीठातील गोंधळ थांबविण्याचे नाव घेत नाही. रोजच्या रोज नवीन समस्यांमुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केली, पण अजूनही परिस्थितीत बदल झालेला नाही. त्यामुळे आता विद्यार्थी एकत्र येऊन आंदोलन करीत आहेत. आता या आंदोलनाला विद्यार्थ्यांसह माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटीलदेखील उपस्थित राहणार आहेत.
‘मुंबई विद्यापीठ वाचवा’ हे आंदोलन विद्यार्थ्यांनी पुकारले आहे. मेरिट ट्रॅक कंपनीचे कंत्राट रद्द करा, आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीत झालेल्या गोंधळाची तपासणी करा, आता विद्यापीठात कार्यरत असलेल्या अधिकाºयांकडे कोणतेही अधिकार नाहीत, त्यामुळे फक्त आश्वासन मिळत आहेत, त्यामुळे अधिकारी बदला, एटीकेटी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची आॅनलाइन तपासणी नको, परीक्षेचे वाढविलेले शुल्क कमी करा, अशा मागण्या आंदोलनादरम्यान केल्या जाणार आहेत.
आॅनलाइन तपासणी नकोच!
आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तरीही आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीवर विद्यापीठ ठाम आहे. सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन करू नये, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. यावेळेस मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.