Join us

जे जे मधील विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर विद्यार्थ्यांचा निर्णय

By सीमा महांगडे | Published: November 25, 2022 10:22 AM

मुंबईजे जे कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात बैठक ...

मुंबई

जे जे कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात बैठक घेवून विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मार्गी लावल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले होते त्याप्रमाणे विदयार्थी प्रतिनिधींनी तूर्तास आंदोलनाला स्थगिती दिली आहे. 

जे जे कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या नवीन वसतिगृहासाठी राज्य शासनाने भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे. नवीन वसतिगृह तयार होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात चर्चगेट परिसरातील मातोश्री या वसतिगृहात  व्यवस्था करावी. मुलींसाठी अंधेरीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिथी गृह भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना थेट फोन करून संयुक्तपणे घेण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी बैठकीत दिले. 

एमपीएससीमार्फतच प्राध्यापकांची भरतीकला महाविद्यालयातील प्राध्यापक हंगामी तत्वावर कार्यरत होते. या हंगामी प्राध्यापकांबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कार्यवाही केली जात आहे. तथापि विविध महाविद्यालयांतील १६९ प्राध्यापकांची रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फतच भरली जाणार असून भरतीची प्रक्रिया सुरु आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात मंत्री पाटील यांनी थेट एमपीएससीचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करुन प्राध्यापक भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जारी करण्याचे निर्देश दिलेत. बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे हा विद्यार्थी संपाला आपण  स्थगिती देत असल्याचे जाहीर करून सर्व विद्यार्थी आजपासून आपल्या वर्गात शिक्षण घेतील अशी माहिती सर जे जे स्कूल ऑफ आर्ट चे जनरल सेक्रेटरी संतोष पारकर यांनी दिली.