मोहनेतील विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित
By admin | Published: July 2, 2014 12:14 AM2014-07-02T00:14:17+5:302014-07-02T00:14:17+5:30
मोहने तिपन्नानगरातील तामिळ भाषिक माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन १५ दिवस उलटून गेले तरी अद्याप पाठपुस्तके मिळालेली नाहीत.
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके वाटप करण्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी मोहने तिपन्नानगरातील तामिळ भाषिक माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन १५ दिवस उलटून गेले तरी अद्याप पाठपुस्तके मिळालेली नाहीत.
मोहने परिसरात एनआरसी कंपनी होती. त्यात तामिळ कामगारांची संख्या जास्त होती. तिपन्नानगर हे वनखात्याच्या जागेवर वसले आहे. या लोकवस्तीतील तामिळ भाषिक विद्यार्थ्यांसाठी महापालिकेने तामिळ माध्यमाची शाळा सुरू केली. आजमितीस २२१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. गेल्या वर्षीपासून आठवीचा वर्गही सुरू करण्यात आला. या शाळेतील विद्यार्थ्यांना तामिळ भाषिक पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत. नगरसेवक मयुरेश पाटील यांनी मागणी केली आहे की, तामिळ भाषेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी पाठ्यपुस्तके मिळत नाहीत. तामिळ राज्य सरकारचा अभ्यासक्रम असल्याने महाराष्ट्र सरकार तामिळ भाषेची पुस्तके छापत नाही. ती त्या राज्यातून मागवून घ्यावी लागतात. इतर महापालिका पुस्तके मागवून घेतात. कमी पडल्यास छायांकित प्रत छापून त्या वाटतात. (प्रतिनिधी)