Join us  

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीच्या काॅलेजचीच भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 7:24 AM

सहा फेऱ्यांमध्ये एक लाख ८४ हजार ३६८ जागांवर विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय अलॉट करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : दहावीची बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर इयत्ता अकरावीकरिता नामांकित महाविद्यालयांत प्रवेश मिळावा, अशी विद्यार्थ्यांची इच्छा असते. मात्र, कटऑफच्या चढ-उतारामुळे पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेपर्यंत अन्य महाविद्यालयांत प्रवेश न घेण्याचा विद्यार्थी व पालकांचा पवित्रा असतो. त्यामुळे अनेकदा विद्यार्थी प्रवेशाकडे पाठ फिरवताना दिसतात. यंदा तिसऱ्या विशेष फेरीपर्यंत एक लाख ४५ हजार २४९ विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला आहे. तर सहा फेऱ्यांमध्ये एक लाख ८४ हजार ३६८ जागांवर विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय अलॉट करण्यात आले होते.

प्रवेशाची चौथी यादीअकरावी प्रवेशासाठीची चौथी यादी गुरुवारी २९ ऑगस्टला जाहीर होणार आहे. मुंबईतून आतापर्यंत दोन लाख ५६ हजार ३१२ विद्यार्थ्यांनी प्रवेशाची निश्चिती केली असली तरी, अजूनही अकरावी प्रवेशाच्या मुंबईत एक लाख ३९  जागा रिक्त आहेत. त्यामुळे यंदा ही अकरावी प्रवेशाच्या जागा महाविद्यालयात रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. चौथ्या फेरीनंतरही प्रवेशासाठी विद्यार्थी राहिल्यास त्यांच्यासाठी शिक्षण विभागाकडून पुढील वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यंदा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही फेरी नसल्याचे या आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. 

कोट्यातून ५६,५२० प्रवेशाची निश्चिती - आपल्या पसंतीचे महाविद्यालय मिळत नसल्याने अनेक विद्यार्थी कोटा प्रवेशाकडे वळताना दिसून आले. तर अनेकजण याआधीची शैक्षणिक इनहाउस कोट्यातून प्रवेशाला पसंती देतात.- यंदा आतापर्यंतच्या सहा फेऱ्यांत ५६ हजार ५२० विद्यार्थ्यांनी इनहाउस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यातून प्रवेशाची निश्चिती केली आहे. 

टॅग्स :परीक्षा