Join us  

विद्यार्थ्यांची परदेशी शिक्षणाची वाट बिकटच; अडथळ्यांची शर्यत पार करताना नाकीनऊ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 8:07 AM

अमेरिकेसह काही देशांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी अटी, शर्तींसह प्रवेश देण्यास मान्यता दिली आहे. परंतु, सक्तीच्या विलगीकरणाचा अतिरिक्त खर्च माथी पडल्यामुळे होतकरू विद्यार्थ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.

मुंबई : एकेकाळी परदेशात शिक्षणासाठी जाणे प्रतिष्ठेचे मानले जाई. पण कोरोनाने सीमेपल्याडची वाट इतकी बिकट करून ठेवली आहे की, विद्यार्थी स्वतःहून बाहेर शिकायला जाण्यास नकार देऊ लागले आहेत.अमेरिकेसह काही देशांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी अटी, शर्तींसह प्रवेश देण्यास मान्यता दिली आहे. परंतु, सक्तीच्या विलगीकरणाचा अतिरिक्त खर्च माथी पडल्यामुळे होतकरू विद्यार्थ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. अमेरिकी विद्यापीठांत शिक्षणासाठी येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना १ ऑगस्टपासून प्रवेश देण्याचा निर्णय अमेरिकेने नुकताच जाहीर केला. एफ १ किंवा एम १ व्हिसाधारक विद्यार्थ्यांना त्यांचे वर्ग सुरू होण्याच्या ३० दिवस आधी अमेरिकेत येण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु, थेट विमानसेवा मर्यादित असल्याने तिकीट मिळताना अडचणी जाणवत असल्याचे करण मेश्राम या विद्यार्थ्याने सांगितले.सुरुवातीला आंतरराष्ट्रीय प्रवास बंदी, लसीकरणातील अडथळे आणि व्हिसा मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. मात्र, जुलै महिन्यात प्रक्रिया बऱ्याचअंशी सुलभ झाल्याचे गुणवंत दांगट यांनी सांगितले. त्यांचे भाऊ नुकतेच कॅनडाला शिक्षणासाठी रवाना झाले. मात्र, नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक शिक्षेची तरतूद असल्याची माहिती त्यांनी दिली.विमान फेऱ्या वाढविण्याची गरजप्रवासी अधिक आणि जागा कमी अशी स्थिती आहे. याचा फायदा घेऊन तिकिटे चढ्या दराने विकली जात आहेत. आपल्याकडचे बरेच विद्यार्थी कर्ज घेऊन उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात. त्यांना हे दर परवडणारे नाहीत. याचा विचार करून विमानफेऱ्या वाढविण्याची मागणी होत आहे.