विद्यार्थिनी गिरवत आहेत पौरोहित्याचे धडे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 04:39 AM2018-09-18T04:39:47+5:302018-09-18T04:40:09+5:30

८० विद्यार्थिनी करतात गणेशपूजन; ‘श्रीं’च्या पूजनात कृतिशील स्त्री-पुरुष समानतेचे धडे शाळेतूनच

Students are grappling with the teachings of Purohit ..! | विद्यार्थिनी गिरवत आहेत पौरोहित्याचे धडे..!

विद्यार्थिनी गिरवत आहेत पौरोहित्याचे धडे..!

googlenewsNext

मुंबई : गणरायाची विधिवत पूजा करण्यात केवळ ब्राह्मणांची किंवा त्यातही विशेषकरून पुरुषांची मक्तेदारी मानली जाते, पण सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलने ही मक्तेदारी मोडीत काढून शाळेतील विविध समाजांतील तब्बल ८० विद्यार्थिनींना पौरोहित्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले आहे. विशेष म्हणजे, यंदा शाळेतील गणपतीची विधिवत पूजादेखील शाळेच्याच विद्यार्थिनींकडून करण्यात आली.
चार वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या उपक्रमात यंदा ८० मुली आणि ५ मुले पौरोहित्याचे प्रशिक्षण घेत आहेत. शाळेतील संस्कृत विषयाचे शिक्षक विनोद बुवा, आसावरी गोखले आणि दिलीप नागपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थिनींना सत्यनारायण, लक्ष्मीपूजन, तसेच गणेश पूजनाचे शिक्षण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थिनींना कधी-कधी इतरांच्या घरी गणेशपूजन, लक्ष्मीपूजन करण्यासाठीही निमंत्रणे येत असतात, अशी माहिती शाळेचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी दिली. पौरोहित्याच्या वर्गामध्ये पौरोहित्य, तसेच धार्मिक विधी शिकण्यात मुलांपेक्षा मुलींना अधिक कुतूहल आणि उत्साह असल्याचे निरीक्षणही प्रधान यांनी नोंदविले आहे.
पौरोहित्याच्या वर्गासाठी लागणारे साहित्य शाळेमार्फतच उपलब्ध करून दिले जात असून, पालक आणि विद्यार्थ्यांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभत आहे, असे संस्कृतचे शिक्षक व पौरोहित्य वर्गाचे प्रशिक्षक दिलीप नागपूरकर यांनी सांगितले.

गेल्या चार वर्षांपासून शाळेत पौरोहित्य वर्गांचे आयोजन.
आठवी, नववी, दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना ऐच्छिक प्रवेश.
दर आठवड्याला एक तास कालावधीच्या दोन तासिका.
पौरोहित्य वर्गासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.

आमच्या शाळेत विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. मी गेल्या वर्षापासून शाळेतच पौरोहित्याचे प्रशिक्षण घेत आहे. आमच्या परिसरातील लोकांच्या घरी पूजा करण्यासाठी मला बोलाविले जाते.
- ऋतुजा जाधव, विद्यार्थिनी, डी. एस. हायस्कूल

Web Title: Students are grappling with the teachings of Purohit ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.