साहित्य वाचनातून विद्यार्थी घडतात- अखिलेन्द्र मिश्रा
By admin | Published: January 12, 2017 05:44 AM2017-01-12T05:44:52+5:302017-01-12T05:44:52+5:30
विविध विषयांच्या साहित्य वाचनामध्ये विद्यार्थ्यांनी रस घेतला पाहिजे. आयुष्यात कितीही यशस्वी झालात तरी साहित्याची
मुंबई : विविध विषयांच्या साहित्य वाचनामध्ये विद्यार्थ्यांनी रस घेतला पाहिजे. आयुष्यात कितीही यशस्वी झालात तरी साहित्याची आवड जोपासली पाहिजे. कारण साहित्य तुमच्या ज्ञानात कायम भर घालत असते. म्हणूनच उत्तम भविष्यासाठी आताच्या तरुण पिढीने साहित्याशी जोडले गेले पाहिजे, असे प्रतिपादन अभिनेता अखिलेन्द्र मिश्रा यांनी
केले.
विलेपार्ले पूर्व येथील मुकेश पटेल स्कूल आॅफ टेक्नोलॉजी मॅनेजमेंट अॅण्ड इंजिनीअरिंग महाविद्यालय आयोजित ‘सत्त्व’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मिश्रा बोलत होते. मुंबई आणि उपनगरातील विविध महाविद्यालयांनी या महोत्सवात सहभाग घेतला आहे. तीन दिवस चालणाऱ्या महोत्सावातील पहिल्या दिवशी गाड्यांचे प्रदर्शन तरुणांचा आकर्षणबिंदू ठरला. या महोत्सवात समूह नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण केले. रंजित देव आणि मयुरेश वाडकर यांनी नृत्य स्पर्धेचे परीक्षण केले.
या वेळी घेण्यात आलेल्या डीजे वादन स्पर्धेने महाविद्यालयाचा कॅम्पस दणाणून सोडला. महिला डीजे वादक शिल्पी चाणक्य पिल्ले यांनी डीजे वादन स्पर्धेचे परीक्षण केले. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी फिफा २०१७, काउंटर स्ट्राइक या खेळाचे आयोजन केले होते. किक बॉक्सिंगसारख्या खेळाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. दरम्यान, मॅनेजमेंट विभागातर्फे बिझनेस लीडर, सेल्स आॅफ द ईअर, आयपीएल अॅक्शन अशा विविध खेळांचे आयोजन या महोत्सवात करण्यात आले होते. या फेस्टचा गोडवा वाढला तो चॉकलेट मेकिंग स्पर्धेमुळे. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची चॉकलेट या स्पर्धेत तयार केली. या फेस्टमधील शोकेस स्पर्धेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत लहान मुलांसाठी कागदापासून कपडे तयार करण्यात आले. यासाठी विद्यार्थ्यांना एकच तास देण्यात आला होता. गाण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गाण्यावर सर्वांनी ताल धरला. (प्रतिनिधी)