चिमुरडे विद्यार्थी दप्तराच्या ओझ्याखालीच!
By Admin | Published: December 15, 2015 04:37 AM2015-12-15T04:37:40+5:302015-12-15T04:37:40+5:30
दप्तराचे ओझे विद्यार्थ्यांच्या वजनाहून १० टक्क्यांनी कमी ठेवण्याचे आदेश देत, शालेय शिक्षण विभागाने काही दिवसांतच दप्तराचे ओझे कमी करण्याचा गाजावाजा केला होता.
- चेतन ननावरे / स्नेहा मोरे, मुंबई
मुंबई : दप्तराचे ओझे विद्यार्थ्यांच्या वजनाहून १० टक्क्यांनी कमी ठेवण्याचे आदेश देत, शालेय शिक्षण विभागाने काही दिवसांतच दप्तराचे ओझे कमी करण्याचा गाजावाजा केला होता. त्यासाठी शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शासन निर्णयही घेतला. मात्र, निर्णय घेताना व घोषणा करताना शासनाने दाखविलेली तत्परता निर्णयाची अंमलबजावणी करताना दिसत नसल्याचे वास्तव ‘लोकमत रिअॅलिटी चेक’च्या माध्यमातून उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, उच्च न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्यामध्ये कोणताही फरक सध्या पडलेला नाही.
‘रिअॅलिटी चेक’मध्ये सत्य आले समोर...
‘रिअॅलिटी चेक’मध्ये ‘लोकमत’ प्रतिनिधींनी मुंबईतील मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केली.
त्यात अभ्यास मंडळामार्फत पुरविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त अधिक वह्या, जाड पुठ्ठ्यांच्या फुलस्केप वह्या, प्रयोग वह्या, अनावश्यक लेखन साहित्य, स्वाध्याय पुस्तिका, अधिक वजनाचा कंपास बॉक्स, पिण्याच्या पाण्याची बाटली, खाऊचा डबा असे इतर साहित्य आढळले.