मुंबई : अंतिम परीक्षेएवजी सरासरीच्या आधारावर निकाल लावण्याचा राज्य सरकारच्या हट्टामुळे महाराष्ट्रातील एक पिढीच उद्धवस्त होण्याची शक्यता आहे. ११ अकृषी विद्यापीठात अंतिम वर्षाचे ८,७४,८९० विद्यार्थी असून यात एटीकेटी असलेल्यांची संख्या ३,४१,३०८ इतकी आहे. या सर्व विद्यार्थ्यांना सरासरी नापास करणार का, असा प्रश्न भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. या ४० टक्के विद्यार्थ्यांसाठी भाजप संघर्ष करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकार सरासरी गुणांवर निकाल लावण्याच्या प्रयत्नात आहे. एकट्या मुंबई विद्यापीठात अंतिम वर्षाला २,३,७०० विद्यार्थी असून त्यातील ७३ हजार एटीकेटी असलेल्या ३५.८३%विद्यार्थ्यांना नापास करून तुम्ही ‘सरासरी’ वागलात तरी आम्ही त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असे शेलार म्हणाले.मुंबईप्रमाणे सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अंतिम वर्षाच्या २,२५,१२४पैकी ४३.४१ टक्के म्हणजे एक लाख विद्यार्थी एटीकेटीचे, तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ७०,२३४ पैकी एटीकेटी असलेले ३५ हजार विद्यार्थी आहेत. गोडवांना विद्यापीठात २४ हजार विद्यार्थी असून त्यातील १६ हजार, तर नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात ७० हजार विद्यार्थ्यांपैकी २१ हजार एटीकेटी असलेले आहेत. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात ७३,५०६पैकी ३०,८२८ विद्यार्थी, तर सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठात ३८ हजारपैकी १९ हजार विद्यार्थी, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ७३,५२१ विद्यार्थ्यांपैकी ९,१६१, नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठात ३५,५०० पैकी १५ हजार विद्यार्थी, जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ४६,४६६ विद्यार्थ्यांपैकी १७,८१९ विद्यार्थी, तर एसएनडीटीत १४,८३९ विद्यार्थ्यांपैकी ४,५०० विद्यार्थी एटीकेटीचे आहेत. त्यांना सरासरीच्या आधारे नापास करणार असाल तर संघर्ष करावाच लागेल, असे शेलार म्हणाले.