लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: अनेकदा शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण होते, त्रास दिला जातो, पण विद्यार्थी कोणाकडेही तक्रार करण्यास धजावत नाहीत. शालेय परिसरात विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायांना वाचा फोडण्यासाठी राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांमध्ये दर्शनी भागात तक्रार पेटी ठेवण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी काढलेल्या परिपत्रकात शाळेत तक्रार पेटी बसवण्याची कार्यवाही करण्याचे स्पष्ट केले आहे. शाळेच्या दर्शनी भागात, प्रवेशद्वाराच्या नजीक नजरेस पडेल, अशा ठिकाणी ही पेटी ठेवावी. तक्रारपेटी पुरेशी मोठी आणि सुरक्षित असेल, याची काळजी शाळा प्रशासनाने घ्यावी. तक्रार पेटी आठवड्यात कामकाजाच्या शेवटच्या दिवशी उघडण्यात येणार आहे. तक्रारपेटी उघडताना शाळेचे मुख्याध्यापक/प्राचार्य, पोलीस प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी आणि विद्यार्थी प्रतिनिधी असावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी पोलीस प्रतिनिधी येणे शक्य नसेल, तिथे अन्य प्रतिनिधी असताना तक्रार पेटी उघडण्यात यावी. तक्रार पेटीत आलेल्या तक्रारींची नोंद घेणे आवश्यक आहे. तक्रार निवारणही तत्काळ करण्यात यावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. तक्रार पेटीत महिला शिक्षक अथवा विद्यार्थिनींनी लैंगिक छळाबाबत तक्रार केली असल्यास, शाळेच्या महिला तक्रार निवारण समितीसमोर ठेवण्यात याव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत. नाव गुप्त ठेवण्याचे आदेशतक्रारकर्त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. तक्रारदाराला कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. गंभीर अथवा संवेदनशील तक्रार असल्यास पोलीस यंत्रणेच्या सहाय्याने तत्काळ त्याची दखल घेण्यात यावी, असे आदेश आहेत.
विद्यार्थी आता करू शकणार शाळेतच तक्रार
By admin | Published: May 06, 2017 6:39 AM