प्रमाणपत्राअभावी अडकली विद्यार्थिनीची सनद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 02:39 AM2021-02-13T02:39:12+5:302021-02-13T02:39:29+5:30

विद्यर्थिनीच्या विद्यापीठाला फेऱ्या; परीक्षा विभागाकडून टोलवाटोलवी

Student's charter stuck due to lack of certificate | प्रमाणपत्राअभावी अडकली विद्यार्थिनीची सनद

प्रमाणपत्राअभावी अडकली विद्यार्थिनीची सनद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलमधून प्रमाणपत्र घेतलेल्या विद्यार्थिनीला प्रमाणपत्रासाठी विद्यापीठाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. विद्यार्थिनीला प्रमाणपत्रासाठी आयडॉल व परीक्षा विभागाकडून टोलवाटोलवी करत असल्याचे विद्यार्थिनीने सांगितले असून, तिला नाहक त्रास होत असल्याची तक्रार तिने विद्यार्थी संघटनेकडे  केली आहे. नोकरी करून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयडॉल हे नेहमीच आशेचा किरण ठरले आहे; मात्र या प्रकरणात  या विद्यार्थिनीला विद्यापीठाच्या चकरा मारूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याने तिला वकिलीची सनद घेण्यात अडचण येत आहेत.

आयडॉलमधून २०१४ मध्ये संजना यादव ही विद्यार्थिनी बी.ए. उत्तीर्ण झाली. त्यावेळी तिला पदवीचा निकाल मिळाला; मात्र तिने विद्यापीठातून पदवी प्रमाणपत्र घेतले नाही. बी.ए. झाल्यानंतर संजनाने विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेत, ते शिक्षण पूर्ण केले. विधी शिक्षण पूर्ण झाल्यावर वकिलीची सनद घेण्यासाठी तिला पदवी प्रमाणपत्र आवश्यक असल्याने तिने २०१९ मध्ये आयडॉलकडे प्रमाणपत्रासाठी अर्ज केला; मात्र तुम्ही प्रमाणपत्र नेले असल्याचे तिला सांगण्यात आले. त्यावर प्रमाणपत्र दिल्याची कागदपत्रे दाखवा, अशी विचारणा तिने केल्यावर आयडॉलकडून महात्मा फुले परीक्षा विभागाकडे प्रमाणपत्र असल्याचे सांगण्यात आले. परीक्षा विभागाकडे संपर्क केल्यावर प्रमाणपत्र आयडॉलकडे पाठवल्याचे सांगण्यात आले. प्रमाणपत्र देण्याबाबतची जबाबदारी दोन्ही विभाग एकमेकांवर ढकलत आहेत. त्यामुळे २०१९ पासून दोन्ही विभागाने एकमेकांना केलेल्या पत्रव्यवहारावरून त्यांच्याकडून प्रमाणपत्र गहाळ झाल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप संजना हिने केला आहे.

 विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी महत्त्वाचे असलेले प्रमाणपत्र देण्याबाबत विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून देण्यात येणारी वागणूक ही निंदनीय आहे. यामुळे विद्यापीठाच्या लौकिकाला गालबोट लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कुलगुरुंनी तातडीने कारवाई करून, विद्यार्थिनीला प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी स्टुडन्ट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी केली आहे.

Web Title: Student's charter stuck due to lack of certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.