Join us

दहावीच्या विद्यार्थ्यांची धास्ती वाढली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 5:56 PM

लॉकडाऊन वाढण्याच्या चर्चामुळे पालक विद्यार्थ्यांमध्ये परिक्षेबाबत संभ्रम वाढला 

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा मोठा फटका शिक्षण क्षेत्राला बसला असून संपूर्ण शैक्षणिक वेळापत्रकच यामुळे कोलमडले आहे. मात्र लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर होणाऱ्या काही महत्त्वाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेला राज्यातील कोरोना बाधितांच्या वाढणाऱ्या संख्येमुळे ग्रहण लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. विशेषतः दहावीच्या शेवटच्या भूगोलाच्या पेपरच्या बाबतीत राज्य शालेय शिक्षण विभाग काय निर्णय घेणार? परीक्षा होणार की नाही ? लॉकडाऊन कालावधी वाढला तर परीक्षा कधी घेणार असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागले आहेत. 

 

राज्यातल्या नववी आणि अकरावी इयत्तांच्या परीक्षा , दहावीचा शेवटचा भूगोल विषयांचा पेपर शालेय शिक्षण विभागाकडून स्थगित करण्यात आल्या असून लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर म्हणजेच 14 एप्रिलनंतर या बाबतीत निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र शहरातील आणि राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असून लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता आणि चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत दहावीच्या पेपरच्या बाबतीत शिक्षण विभाग काय निर्णय घेणार? शेवटचा पेपर होणार का ? झाला तर केव्हा ? विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे काय ? असे अनेक प्रश्न पालक विचारू लागले आहेत. दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांना पेपर रद्द झाला तर गुणांची विभागणी, वाटणी कशी केली जाणार याची काळजी वाटू लागली आहे. बेस्ट ऑफ फाईव्हच्या आधारावर पेपर रद्द केला आणि इतर विषयांच्या सहाय्याने सरासरी गुण दिल्यास ज्या विद्यार्थ्यांचा हा विषय चांगला आहे , त्यांचे नुकसानच असल्याची प्रतिक्रिया काही पालक देत आहेत.

 

नववी आणि अकरावीच्या परीक्षांच्या बाबतीत शिक्षण विभागाकडून चाचपणी होत असून पहिली ते आठविप्रमाणे काही निर्णय घेता येईल का यावर विचार सुरू आहे. मात्र दहावीच्या भूगोलाच्या शेवटच्या परीक्षेचे काय यामुळे विद्यार्थी पालकांसह शिक्षकांनाही प्रश्न पडला आहे. शिक्षण विभागाने लवकरात लवकर या बाबतीतील निर्णय घ्यावा अशी मागणी पालक विद्यार्थ्यांकडून होत आहे. 

 

टॅग्स :दहावीकोरोना वायरस बातम्या