Join us

यंदा परीक्षा न देण्याचा विद्यार्थांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबईशहरातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावी व बारावीची परीक्षा नेमकी कशी होणार याबाबत असलेली संभ्रमावस्था; तसेच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई

शहरातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावी व बारावीची परीक्षा नेमकी कशी होणार याबाबत असलेली संभ्रमावस्था; तसेच वर्षभर ऑनलाइन माध्यमातून पूर्ण न झालेला अभ्यासक्रम इत्यादी कारणांमुळे यंदा अनेक विद्यार्थी दहावी व बारावीची परीक्षा द्यायची की नाही यामध्ये अडकून पडले आहेत. या गोंधळाच्या स्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी यंदा बारावीच्या परीक्षांसाठी नोंदणी न केल्याने यंदाच्या विद्यार्थी संख्येच्या नोंदणीत काही अंशी घट दिसून येत आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणीसाठी मुदत देऊनही ही घट दिसून येत आहे.

दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २९ मे तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होणार आहे. कोरोनाचा परिणाम या परीक्षांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. एकही दिवस मुंबईतील विद्यार्थी शाळेत गेले नाहीत मात्र त्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे. सोमवारपासून राज्य मंडळाने विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी उपलब्ध केली आहे.

दहावीच्या विद्यार्थी संख्येत गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली असली तरी मात्र यंदा मोठा परिणाम बारावीवर

झाल्याचे दिसून येत आहे. एका सर्वेक्षणानुसार बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने आतापर्यंत केवळ हजारात २१ टक्के विद्यार्थ्यांचा ४० ते ५० टक्के स्वतःचा असा अभ्यास झाला असल्याचे कबूल केले आहे. अजून कसलाच अभ्यास झाला नसल्याचे सांगणारे विद्यार्थीही ९ टक्के इतके आहेत.

बारावीनंतर करिअर करण्याच्या दृष्टीने आणि प्रवेश प्रक्रियांच्या दृष्टीने बारावीचे गुण महत्त्वाचे ठरत असतात म्हणून अनेक विद्यार्थ्यांनी या काळात परीक्षा न देण्याचा निर्णय ही घेतल्याने बारावीच्या नोंदणीत ही घट दिसून येत आहे.

अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा कुठे घेतल्या जातील? परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी कशी कसरत करावी लागेल? हे माहीत नसल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने ही यंदा परीक्षांसाठी नोंदणीचा केली नाही.

दहावी-बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांसोबतच पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनीही याच कारणांमुळे यंदा परीक्षांसाठी नोंदणीकडे पाठ फिरवली असल्याच्या प्रतिक्रिया पालकांनी दिल्या आहेत. विद्यार्थी पालकांची ऑनलाइन परीक्षाच्या मागणीचा विचार राज्य शिक्षण मंडळाकडून झाला असता तर कदाचित यात फरक दिसला असता, अशी मते काही शिक्षक व्यक्त करत आहेत.

चौकट

दहावीची परीक्षा - २९ एप्रिल ते २९ मे

विद्यार्थी संख्या २०२१- ३ लाख ५९ हजार ८०८

विद्यार्थी संख्या २०२०- ३ लाख ३२ हजार ७४६

पुनर्परीक्षार्थीं २०२१- १६ हजार ३०८

बारावीची परीक्षा - २३ एप्रिल ते २१ मे

विद्यार्थी संख्या २०२१- २ लाख ९२ हजार २६८

विद्यार्थी संख्या २०२०- ३ लाख १४ हजार ४४९

पुनर्परीक्षार्थी २०२१ - २० हजार १६५