सर्वेक्षणातील निष्कर्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशाच्या बऱ्याचशा राज्यांतील कोविड १९ ची परिस्थिती सद्य:स्थितीत नियंत्रणात असून, बऱ्याच राज्यातील शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत. ऑनलाइन शिक्षण आणि प्रत्यक्षातील उपस्थिती यांचा मेळ असलेल्या शाळेचे हायब्रीड मॉडेल विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरत असून देशाच्या विविध राज्यांतील ६९ टक्के विद्यार्थ्यांनी या हायब्रीड मॉडेलला आणि काेराेनानंतर सर्व पूर्वपदावर येत असताना शाळेत जाण्यास आपली पसंती दर्शविली.
ब्रेनली या शिक्षण क्षेत्रासाठी ऑनलाइन व्यासपीठ म्हणून कार्यरत संस्थेने देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन शाळेत जाण्याबद्दलची विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले. यात ३,१०५ विद्यार्थ्यांनी सहभागी हाेऊन प्रतिक्रया दिल्या.
काराेनामुळे शिक्षणात मोठ्या प्रमाणावर बदल झाल्यानंतरही फक्त १९.८ टक्के सहभागींनी २०२० हे वर्ष त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर नकारात्मक परिणाम करणारे ठरले, असे नमूद केले. १२.३ टक्के विद्यार्थ्यांनी त्यांच्या कामगिरीवर काही परिणाम झाला नसल्याचे मत मांडले, तर २३.५ टक्के विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर संमिश्र परिणाम झाल्याचे मत नोंदविले.
तब्बल ४४.४ टक्के विद्यार्थ्यांनी २०२० हे वर्ष त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर सकारात्मक परिणाम करणारे ठरल्याचे सांगितले. यामागचे कारण म्हणजे २६.७ टक्के विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास प्रभावीपणे करण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मची मदत घेतली. २५.३ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन क्लासेससह होम ट्युशन्स केले तर १९.८ टक्के विद्यार्थ्यांनी शैक्षणिक डिव्हाइस (उदा. लॅपटॉप, स्मार्टफो, टॅब इत्यादी) खरेदी केले. २८.७ टक्के विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासासाठी पालकांची मदत घेतली.
२६.१ टक्के विद्यार्थ्यांना ‘फ्लेक्झिबल आणि हायब्रीड लर्निंग मॉडेल’मध्ये रस आहे. सर्वेक्षणातील १४.५ टक्के विद्यार्थ्यांनी शाळा सुरू झाल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.
* ऑनलाइन परीक्षांचे आव्हान
मागील वर्षी परीक्षा अडचणीची व मानसिक त्रासाची ठरल्याचे मत विद्यार्थ्यांनी नोंदविले. ४५.७ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा अधिक आव्हानात्मक असल्याचे सांगितले, तर ३०.५ टक्के विद्यार्थ्यांनी त्या नियमित परीक्षांप्रमाणेच असल्याचे सांगितले. २३.८ टक्के विद्यार्थ्यांनी याबाबत मत व्यक्त करणे कठीण असल्याचे नमूद केले.
* तंत्रज्ञान, सुरक्षितता, शिक्षण यांची सांगड घालणे गरजेचे
सर्वेक्षणात दर्शवल्याप्रमाणे, शिक्षणात झालेल्या मूलभूत बदलांबाबत विद्यार्थ्यांचा मोठा वर्ग भविष्यातील शिक्षण कार्यपद्धतीविषयी आशादायी असल्याचे निदर्शनास आले. तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि शिक्षण यांची सांगड घालणे गरजेचे आहे.
- राजेश बिसाणी,
मुख्य उत्पादन अधिकारी, ब्रेनली
......................