विद्यार्थ्यांनी केला १८ तास अभ्यास
By admin | Published: April 10, 2017 06:37 AM2017-04-10T06:37:56+5:302017-04-10T06:37:56+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दिवसाला १८ तास अभ्यास करायचे. अनेक साहित्यामध्ये याचा उल्लेख आहे
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दिवसाला १८ तास अभ्यास करायचे. अनेक साहित्यामध्ये याचा उल्लेख आहे. पण, दिवसातले १८ तास अभ्यास करणे सोपे नाही. त्यांच्या आचार-विचार नवीन पिढीत रुजावे म्हणून माटुंगा येथील व्हीजेटीआयच्या २६५ विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत अठरा तास अभ्यास करून डॉ. आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली.
१४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पण, यापेक्षा आंबेडकरांचे आचरण मुलांनी प्रत्यक्षात अनुभवल्यास त्यांना अधिक समजेल या विचाराने प्रेरित होऊन व्हीजेटीआयचे डॉ. व्ही.बी. निकम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला. या उपक्रमाला व्हीजेटीआयचे संचालक ओ.जी. काकडे, डॉ. अभय बांगुले यांनीही मार्गदर्शन केले. त्यानुसार, निकम यांच्यासह त्यांचे सहकारी प्रा. सुषमा वाघ आणि प्रा. राजेश पाटील यांनी मूर्त रूप देण्यास मदत केली. दोन दिवसांपूर्वी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर ही संकल्पना मांडण्यात आली. तब्बल २६५ विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी नोंदणी केली. ६२ विद्यार्थिनीही या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. १८ तासांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास कोणता करायचा याचे बंधन नाही. काही विद्यार्थी डॉ. आंबेडकरांची पुस्तके, चरित्र वाचत होते. काही विद्यार्थी दलित साहित्याचा अभ्यास करत होते. अभियांत्रिकीचाही काही विद्यार्थी अभ्यास करत होते. १८ तासांमध्ये विद्यार्थ्याना ३ वेळा नाश्ता आणि २ वेळा जेवण देण्यात आले. वाचनालयात विद्यार्थ्यांना बसण्याची सोय आणि पुस्तके उपलब्ध करून देण्यात येत होती, असे निकम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)