विद्यार्थ्यांनी केला वर्सोवा बीच चकाचक
By admin | Published: September 10, 2014 01:44 AM2014-09-10T01:44:05+5:302014-09-10T01:44:05+5:30
गणपती विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात निर्माल्य आणि कचरा समुद्रकिनारी जमा होतो
अंधेरी : गणपती विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात निर्माल्य आणि कचरा समुद्रकिनारी जमा होतो. पालिका आपल्या परीने स्वच्छता मोहीम राबवत असते. पण जर नागरिकांचा आणि विद्यार्थ्यांचा सहभाग मिळाला, तर ती स्वच्छता मोहीम यशस्वी होते. याचाच प्रत्यय वर्सोवा बीचवर आला.
विसर्जनानंतर सामाजिक बांधिलकी पाळत वर्सोवा वेल्फेअर शाळा आणि कमला मेहता महाविद्यालयाच्या एन.सी.सी. आणि एन.एस.एस.च्या सुमारे १५० विद्यार्थ्यांनी वर्सोवा येथील सात-बंगला बीच चकाचक केला. जनता कल्याण केंद्र, अगरवाल ग्लोबल फाउंडेशन संस्था यांनी पालिकेच्या के (पश्चिम) विभागाच्या सहकार्याने ही स्वच्छता मोहीम सकाळी ७ ते ११ या वेळेत राबवली.
गणपती विसर्जनानंतर मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेले सुमारे दोन ट्रक निर्माल्य आणि अन्य कचरा गोळा करून तो पालिकेकडे सुपुर्द केल्याचे मुंबईचे माजी उपमहापौर आणि वर्सोवा वेल्फेअर शाळा आणि कमला मेहता महाविद्यालयाचे अध्यक्ष अरुण देव यांनी दिली. के (पश्चिम)विभागाचे सहायक पालिका आयुक्त विश्वास शंकरवार यांनी सहकार्य करून पालिकेची यंत्रणाही या मोहिमेसाठी उपलब्ध करून दिली होती.
या वेळी अगरवाल ग्लोबल फाउंडेशनचे राजू अगरवाल, उद्योगपती अजय महेश्वरी, भाजपा उत्तर पश्चिमचे अध्यक्ष अभिजित सामंत, वर्सोवा भाजपा अध्यक्ष राज यादव, सहसचिव अमित तोतला, सचिव सीमा अहिर तसेच विद्यार्थी, शिक्षक आणि अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)