अपंग विद्यार्थी तीन तास उन्हात
By admin | Published: February 2, 2015 10:48 PM2015-02-02T22:48:11+5:302015-02-02T22:48:11+5:30
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा शासनाच्या तरतुदीनुसार बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे.
जयंत धुळप ल्ल अलिबाग
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा शासनाच्या तरतुदीनुसार बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे. परंतु या शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहिलेल्या रायगड जिल्ह्यातील अपंग मुलांना घेवून सोमवारी त्यांचे पालक येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याकरिता आले. शासनाच्या निष्क्रिय आणि बेफिकिरीमुळे त्यांना भर रस्त्यावर सुमारे तीन तास उन्हात बसावे लागले. या साऱ्या प्रकाराबाबत अपंग मुलांच्या पालकांमध्ये संतापाचे वातावरण होते.
इतर वेळी राजकीय पक्षांचे मोर्चे वा बड्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा येतो वा धरणे आंदोलन होते त्या वेळी त्यांच्याकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आवर्जून करणाऱ्या जिल्हा प्रशासनास या अपंग मुलांना देखील तहान लागते याचा विसर पडला. त्यामुळे साध्या पिण्याच्या पाण्याची देखील उपलब्धता येथे नव्हती. अल्पदृष्टी, अंध, कर्णबधिर, वाचादोष, अस्थिव्यंग, गतिमंद, बहुविकलांग, मेंदूचा पक्षाघात अशा नैसर्गिक अपंगत्व असणाऱ्या या अपंग मुलांची नैसर्गिक विधीकरिता देखील मोठी कोंडी झाली होती. या अपंग मुलांना व त्यांच्या पालकांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच असलेल्या बागेतील झाडांच्या सावलीत बसू द्या अशी विनंती पत्रकारांनी येथे बंदोबस्ताकरिता असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना केली, परंतु त्यांनी ती विनंती नाकारुन पोलीस असंवेदनशीलतेचेच दर्शन घडवले.
या मोर्चाचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता. रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एम.एस.महाजन यांनी यावेळी उपस्थित राहणे अनिवार्य होते परंतु ते गैरहजर होते. शासनाच्या बेफिकिरीमुळे अपंग विद्यार्थी व त्यांच्या पालकांना भररस्त्यावर हालअपेष्टा व कुचंबणा सोसावी लागली. यास जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार का, असा प्रश्न लोकशाही दिन पत्रकार परिषदेत पत्रकारांनी जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांना विचारला असता, याबाबत चौकशी करुन, संबंधिांवर कारवाई निश्चित करण्यात येईल, असे भांगे यांनी सांगितले.
आणखी वृत्त/३
४अपंग विद्यार्थ्यांना रोज व नियमित विशेष शिक्षक मिळावे, अपंग विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी अपंग शिक्षणातील पदवी असलेल्या शिक्षकांची नियुक्ती करावी, कर्णबधिर विद्यार्थ्यांना मातृभाषेतून (खुणांच्या भाषेतून) शिक्षणाची व्यवस्था करावी, स्वतंत्र अनुकूलित अभ्यासक्रम व पाठ्यक्रम तयार करण्यात यावा आणि अपंग मुलांच्या विशेष शिक्षणाचा स्वतंत्र विभाग निर्माण करावा, अशा प्रमुख आणि गरजेच्या मागण्यांकरिता हे आंदोलन करावे लागत असल्याचे महाजन यांनी सांगितले.
४सध्या महाराष्ट्रात अल्पदृष्टीचे ६९,६३८, अंध १०,२३६, कर्णबधिर ३४,२७९, वाचादोष ३०,१७४, अस्थिव्यंग ४०,०९२, गतिमंद ५२,८६४, बहुविकलांग ११,५७७, मेंदूचा पक्षाघात ३००५, अध्ययन अक्षम ३८,८१७, स्वमग्न २६०१ अशी २ लाख ९३ हजार २८३ आतापर्यंंत निष्पन्नसंख्या आहे. यात पहिलीत ३० हजार ४८७, दुसरीत ३६ हजार २५९, तिसरीत ४१ हजार ७६६, चौथीत ४४ हजार ७४७, पाचवीत ४१ हजार ४२१, सहावीत ३७ हजार २३४, सातवीत ३६ हजार २९१, तर आठवीत २६ हजार ८७४ शिक्षण घेत आहेत.