Join us  

विद्यार्थ्यांनी शोधला लघुग्रह, २०२० क्युझी असे नामकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 3:50 AM

कॅलिफोर्निया येथे असलेल्या दुर्बिणीतून वेळोवेळी अंतराळ निरीक्षणे नोंदली जातात.

मुंबई : आयआयटी मुंबईच्या कुणाल देशमुख आणि कृती शर्मा या दोन विद्यार्थ्यांनी पृथ्वीपासून २९५० किलोमीटर अंतरावरून गेलेल्या लघुग्रहाचा शोध लावला आहे. त्या लघुग्रहाचे २०२० क्युझी असे नामकरण करण्यात आले आहे. आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या संशोधनातील लघुग्रहावर आंतरराष्ट्रीय प्रकल्प संशोधकांनीही शिक्कामोर्तब करण्यात केले आहे. याआधी २०११मध्ये कॅटलीना स्काय सर्व्हेच्या माध्यमातून पृथ्वीपासून २५०० किलोमीटर अंतरावरून गेलेल्या लघुग्रहाची नोंद झाली होती.पृथ्वीलगत निअर अर्थ आणि मेन बेल्ट अशा स्तरांमधील लघुग्रहांवर संशोधनाचे काम सुरू असते. नॅशनल सायन्स फाउंडेशनकडून अनुदान मिळत असलेला हा संशोधन प्रकल्प झेडटीएफ या नावाने ओळखला जातो. या संशोधन प्रकल्पात तैवान, भारत या देशातील संघांचा समावेश आहे. कॅलिफोर्निया येथे असलेल्या दुर्बिणीतून वेळोवेळी अंतराळ निरीक्षणे नोंदली जातात. त्या निरीक्षणांचे विश्लेषण या संघांकडून होते, अशी माहिती आयआयटी मुंबईचे सल्लागार प्रा. वरुण भालेराव यांनी दिली. गेले एक वर्ष यावर काम करीत असलेल्या मेट्रोलॉजी अ‍ॅण्ड मटेरिअल सायन्स विभागाचा, शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी कुणाल देशमुख व मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी कृती शर्मा यांच्या संशोधनाचे हे यश असल्याचे भालेराव यांनी सांगितले.तीन ते सहा मीटर एवढा छोटा हा लघुग्रह असला तरी संशोधनाच्या दृष्टीने तो महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. रोबोटिक झेडटीएफकडून घेण्यात आलेल्या छायाचित्रांचा अभ्यास करताना हा लघुग्रह कुणाल आणि कृतीच्या लक्षात आला. १६ आॅगस्ट रोजी आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी लघुग्रहाची माहिती दिली. त्यानंतर मंगळवारी सर्व संस्थांकडून याला पुष्टी देण्यात आली. झेडटीएफ टीमकडून ही माहिती इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रोनॉमिकल युनियन प्लॅनेट सेंटरला देण्यात आली. आता या लघुग्रहाविषयी अधिक माहिती गोळा केली जात आहे. पृथ्वीच्या जवळ असताना या लघुग्रहाने मार्ग बदलल्याचे झेडटीएफचे सह संशोधक टॉम प्रिन्स यांनी स्पष्ट केले. टॉम प्रिन्स हे नासासाठी काम करणाºया जेपीएल संस्थेचे वरिष्ठ संशोधक आहेत.>या लघुग्रहाचा शोध लावण्यासाठी आमच्या कार्याचा हातभार लागला याचा आम्हाला अभिमान आहे. निश्चितच याची दखल पुढच्या संशोधनात घेतली जाईल.- कुणाल देशमुख, संशोधक विद्यार्थी, आयआयटी, मुंबई>आयआयटीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी घेतलेले संशोधन आणि माहितीचे विश्लेषण करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीला यश मिळाले आहे. ही भारतासाठीही अभिमानाची गोष्ट आहे.- वरुण भालेराव, प्राध्यापक,आयआयटी, मुंबई