कोरोनामुळे सरकारी रेखाकला परीक्षांचे आयोजन न करण्याचे व गुण न देण्याचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या यंदा सवलतीच्या कलागुणांवर कोरोनामुळे संक्रात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दहावीच्या परीक्षेत सरकारी रेखाकला परीक्षेचे सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येऊ नयेत असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे. तसेच २०२०-२१ साठी दृश्यकला पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेमध्येही रेखाकला उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यात येऊ नयेत, असे निर्णयात नमूद केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या हक्काच्या सवलतीच्या कलागुणांवर गदा आल्याची नाराजी विद्यार्थी, पालकांमध्ये आहे.
सरकारी रेखा कला परीक्षा (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) राज्यात व राज्याबाहेर एकूण ११३० केंद्रांवर घेण्यात येतात. एका परीक्षा केंद्रावर १० ते १५ विद्यार्थी सहभागी शाळांचे विद्यार्थी प्रविष्ट होऊन एका परीक्षा केंद्रावर एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षांचे मिळून सरासरी ५०० ते १००० विद्यार्थी बसतात. असे एकूण तब्बल ६ ते ७ लाख विद्यार्थी या परीक्षांना हजेरी लावतात. राज्यातील कोविड १९च्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने यंदा ही परीक्षा हाेणार नाही. कला शिक्षण प्रशिक्षण पदविका व मूलभूत अभ्यासक्रम यांना सूट देण्यात आल्याचे निर्णयात नमूद आहे.
परीक्षांचे आयाेजन व्हावे व त्यासाठी सर्व काही प्रयत्न करायला मुख्याध्यापक संघटना व शाळा तयार असताना असा निर्णय घेणे, हे चुकीचे आहे अशी प्रतिक्रिया मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे मुंबई सचिव प्रशांत रेडीज यांनी दिली. आधीच कोरोनामुळे विद्यार्थ्यांची गुणांबाबतची धास्ती वाढलेली असताना त्यांच्या हक्काच्या सवलतीच्या गुणांवर गदा आणणे हा त्यांच्यावर अन्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अद्याप क्रीडा गुणांबाबतही विभागाने काहीच निर्णय घेतले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
- असे मिळतात सवलतीचे कला गुण
दहावी विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेत ए ग्रेड मिळाल्यास ७ गुण.
दहावी विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेत बी ग्रेड मिळालयास ५ गुण.
दहावी विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षेत सी ग्रेड मिळाल्यास ३ गुण.
विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय त्याला इंटरमिजिएट परीक्षेचे गुण मिळत नाहीत.