Join us

विद्यार्थ्यांना कोविड बॅच म्हणून दूषण नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:06 AM

शिक्षक समुपदेशक जयवंत कुलकर्णी यांचे मतसीमा महांगडेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहावीच्या निकालानंतर यंदा अंतर्गत मूल्यमापनामुळे विद्यार्थी ...

शिक्षक समुपदेशक जयवंत कुलकर्णी यांचे मत

सीमा महांगडे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दहावीच्या निकालानंतर यंदा अंतर्गत मूल्यमापनामुळे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांना कुवत नसताना जास्त गुण मिळाले. यंदाची बॅच ही कोरोना बॅच आहे, अशा प्रतिक्रिया समाजघटकांमधून उमटत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होतच आहे; शिवाय अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आणि वक्तव्यांचे दूरगामी परिणाम या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर होऊ शकतात, अशी भीती शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि समुपदेशक व्यक्त करीत आहेत.

अंतर्गत मूल्यमापन हा कोरोनामुळे परीक्षा न घेता आल्याने यंदा अवलंबलेला पर्याय होता. मागील वर्षीचा निकाल आणि यंदाचा निकाल यांची तुलना केली असता, चार ते पाच टक्क्यांची वाढ सोडल्यास मोठा फरक दिसत नाही. त्यामुळे गुणांचा फुगवटा, मार्कांची सूज, परीक्षांवरचा उतारा अशी दूषणे लावून यंदा दहावीत उत्तीर्ण झालेल्यांचे खच्चीकरण केले जाऊ नये, अशी अपेक्षा समुपदेशकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. निकाल पाहून पालक, मित्र, शिक्षक, नातेवाईक, आजूबाजूचा समाज यांपैकी कोणीही प्रश्नांकित नजर, खोचक टीका, टोमणेबाजी, शाब्दिक उपरोध किंवा हिणकस दृष्टिकोनातून पाहून विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, असे मत कुर्ला येथील गांधी बालमंदिर हायस्कूल येथे शिक्षक समुपदेशक म्हणून कार्यरत असणाऱ्या जयवंत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी ज्या परिस्थितीत शारीरिक, मानसिक, शैक्षणिक, भावनिक संघर्षातून यश मिळविले आहे ते पाहता गुणांचा विचार हा येणाऱ्या काळात त्यांना बळ देणारा आहे, या दृष्टीनेच त्याकडे पाहायला हवे, असे ते म्हणाले.

लेखी आणि प्रचलित परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील क्षमतांची चाचपणी होत असते, त्यावरून त्यांना कितपत आणि काय कळले, याचा अंदाज येऊ शकतो. मात्र, त्यावरून त्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक, अंतर्गत कौशल्यांवर कोणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही. म्हणून दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनावर आधारित निकालाचा उपहास न करता विद्यार्थ्यांसमोर येऊ घातलेली असंख्य आव्हाने पेलविण्यासाठी त्यांना पाठबळ देण्याची आवश्यकताही त्यांनी स्पष्ट केली.