आई मला शाळेला जायचंय, जाऊ दे ना वं....!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 08:57 AM2021-08-08T08:57:57+5:302021-08-08T08:58:11+5:30
लहान मुलांसाठी अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिबंधात्मक लस नसल्याने मुलांना प्रत्यक्ष शाळेत पाठवावे कि ऑनलाइन शिक्षण सुरु ठेवावेत याबाबत पालक द्विधा अवस्थेत आहेत.
मुंबई : राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात पुढच्या आठवड्यात अंतिम निर्णय घेण्यात असला तरी शाळा सुरु होणार म्हणून मुलांमध्ये आत्ताच उत्साहाचे भरते आले आहे. एकीकडे शाळा सुरु होणार म्हणून विद्यार्थ्यांची स्वारी खुश असली तरी दुसरीकडे पालकांमध्ये मात्र संभ्रमावस्था दिसून येत आहे.
लहान मुलांसाठी अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिबंधात्मक लस नसल्याने मुलांना प्रत्यक्ष शाळेत पाठवावे कि ऑनलाइन शिक्षण सुरु ठेवावेत याबाबत पालक द्विधा अवस्थेत आहेत.
शाळा सुरु होणार या बातमीने मुलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पवार पब्लिक हायस्कुलमध्ये चौथीच्या वर्गात असणारी तनया तर पुन्हा आम्ही एकदा शाळेच्या मैदानात खेळ खेळणार, विविध उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेऊन एकमेकांशी स्पर्धा करणार आणि शिक्षकांकडून काही वेळेस ओरडा ही खाणार, याची मज्जा वेगळी आहे असे मत व्यक्त करते. तिसऱ्या लाटेची भीतीने सुरक्षिततेच्या बाबतीतील पालकांची चिंता कायम आहे.
सगळ्या गोष्टी अनलॉक होत असताना मुले शाळेत जाऊन ही काळजी घेऊच शकतात किंबहुना प्रशासनाने यासाठी आवश्यक मदत करावी अशी प्रतिक्रिया मंगेश कळंबे देतात. शाळा सुरु व्हाव्यात की नाही याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात मतमतांतरे असली तरी ऑनलाईन शिक्षणापेक्षा ऑफलाईन वर्गच बरे अशी धारणा नक्कीच झाली असल्याने विदयार्थी पालक सर्व खबरदारी घेऊन शाळा सुरु होण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
काय म्हणतात, विद्यार्थी- पालक
शाळा सुरु होणार असल्याने मी खूप समाधानी आहे. दहावीच्या महत्त्वाच्या वर्षात शिक्षकांकडून पुन्हा एकदा प्रत्यक्ष वर्गात शिकायला मिळेल, संकल्पना अधिक स्पष्ट होतील आणि याचा उपयोग दहावीच्या परीक्षेत होईल.
- प्रियांका कळंबे, दहावी, पीजेपी हायस्कुल
प्रत्यक्ष पद्धतीने वर्ग सुरु होणे ही विदयार्थ्यांची शैक्षणिक गरज आहे, मात्र पाचवी ते आठवीची मुले ही लहानच आहेत. शाळांमध्ये गेल्यावर संसर्गाचा धोका होऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नसल्याने ऑफलाईन वर्गांच्या बाबतीत थोडी भीती आहे. कुसुम राणे, पालक