Join us

अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना उद्यापर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 6:38 AM

Admission extended till tomorrow : मंगळावरी १६ फेब्रुवारी सकाळची १० पर्यंत विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी अर्ज करू शकणार आहेत, तर अलॉटमेंट मिळालेले विद्यार्थी सायंकाळी सहापर्यंत आपले प्रवेश निश्चिती करू शकणार आहेत.

मुंबई : ज्या विद्यार्थ्यांना काही अपरिहार्य कारणास्तव अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घेता आला नाही आहे, त्यांना प्रवेश निश्चितीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एफसीएफएसच्या दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती शिक्षण संचालक यांनी दिली आहे. ही मुदतवाढ १६ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.मंगळावरी १६ फेब्रुवारी सकाळची १० पर्यंत विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी अर्ज करू शकणार आहेत, तर अलॉटमेंट मिळालेले विद्यार्थी सायंकाळी सहापर्यंत आपले प्रवेश निश्चिती करू शकणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आपापले आधीचे प्रवेश रद्द करायचे आहेत त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत वेळ असणार आहे. अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी असल्याचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई विभागातून अकरावी प्रवेशासाठी ८२ हजार २३९ जागा उपलब्ध आहेत. एफसीएफएसच्या दुसऱ्या फेरीत ४ हजार ९३८ जागा अलॉट करण्यात आल्या होत्या, त्यापैकी ४ हजार ५३५ जागांवर प्रवेश झाले आहेत. अद्याप ७७ हजार ७०४ जागा उपलब्ध आहेत. आता पुन्हा १६ तारखेपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने विद्यार्थी पालकांना दिलासा मिळाला आहे.शिक्षण संचलनालयाच्या माहितीवरून राज्यात सहा विभागांतील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत १ लाख ८० हजारहून अधिक जागा रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रिक्त जागांचे प्रमाण काहीसे कमी झाले असल्याने कोणीही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी हा अतिरिक्त एफसीएफएस फेरीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र,  दरवर्षी ऑक्टोबरपर्यंत संपणारी प्रवेश प्रक्रिया यंदा फेब्रुवारीत सुरू होऊनही संपलेली नाही. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण करून त्यांचा अकरावीचा अभ्यासक्रम पूर्ण कसा करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :शिक्षण